पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/८७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७२ लो. टिळकांचे केसरींतील लेख

फीमेल हायस्कुलांतील शिक्षणक्रम.
(नंबर २)

मुख्य उद्देश एक असून साधनांसंबंधानें मनुष्यामनुष्यांत मतभेद पडणे अगदीं स्वाभाविक असताही आमच्या इकडील 'सुधारकांस' त्याचा प्रतिक्षणीं इतका विसर पडावा, हे अगदीं चमत्कारिक आहे. आजपर्यंत अशी स्थिति असे कीं, एकानें सुधारणा हवी म्हणावें व दुस-यानें नको म्हणावें. पहिल्या वर्गांत तत्कालील बहुतेक आंग्लविद्याविभूषित लोक असत व दुस-यांत बाकीचांचा अंतर्भाव होत होता. अशा वेळीं एक पक्ष दुस-यास असंस्कृत ठरवून आपलाच पक्ष सप्रमाण आहे, अशी आपल्या मनाची समजूत करून घेत असे. पुढें इंग्रजी शिकलेल्या लोकांची संख्या दिवसेंदिवस जशी वाढत चालली, व त्या विद्येच्या मदाची पहिली गुंगी निघून गेली, तेव्हां वर सागितलेल्या साधनवैचित्र्यामुळें होणार मतभेद स्वभावत:च दृष्टीस पडूं लागला व सुधारणेची सूत्रे ज्या मताच्या लोकांनी ताब्यांत घेतलीं होतीं, त्यांच्या हातून सुधारणेचें काम कसकसें होत आहे, याची चर्चा सुरू झाली. ही चर्चा आमच्या प्राथमिक सुधारकास अर्थातच रूचली नाहीं. आपल्या विरूद्धपक्षीय लोकांस असंस्कृत म्हणून नालायक ठरविण्याची त्यांची कोटी सहजच लंगडी पडली. बरें, आपल्या कामाची भरभराटी दाखवून विरूद्धपक्षाचे तोंड बंद कारावें, तर तिकडूनही पंचाईत. अशा त-हेनें दोहोंकडून पेंचात सांपडल्यावर त्यांच्यापैकीं एकानें अशी युक्ति काढिली कीं, हल्लीं आपल्या कार्यास जे प्रतिबंध करितात त्यांस असंस्कृत जरी म्हणतां येत नाहीं तरी "त्यांस संस्कार असून नसून सारखाच, कारण त्या संस्काराचा ते गैरउपयोग करितात," अशी कोटी करून आज आपला बचाव करावा. ही कोटी आमच्या प्राथमिक सुधारकांपैकीं ब-याच इसमास पसंत पडली; व त्या अस्त्राचा ते विरुद्धपक्षावर उपयोग करूं लागले. पण पूर्वीचा विरोध व हल्लींचा विरोध यांतील अंतर मनांत न आणिल्यामुळें, या कोटीचा असा परिणाम झाला कीं, आमच्या सुधारकांसच त्यामुळें द्वितीय नामसंस्कार प्राप्त झाला. आमच्या सुधारकांस हें नांव कितपत आवडत असेल तें असो; परंतु इतकें खचित कीं, तें त्यांस त्याच्या गुणावरूनच प्राप्त झालें आहे, व जोंपर्यंत आपल्या मताहून भिन्न मताचे लोक असंस्कृत आहेत अशी त्यांची समजूत राहील , किवा ती तशी आहे असें ते दाखवितील, तोंपर्यंत त्याचें वरील नावही कायम राहील. सुधारणेच्या कामीं अशी द्वैधी वृत्ति व्हावी ही गोष्ट एकांशीं चांगली नाहीं हें आम्हांस मान्य आहे. तथापि एकी होणे असल्यास कोणत्या पक्षानें कोणाकडे जावें, हा एक मोठाच प्रश्न असल्यामुळें या प्रश्नाची तडजोड कशी होईल, याची आम्हांस शंकाच


(*तारीख ४ आक्टोबर १८८७)