पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/८८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

फीमेल हायस्कुलांतील शिक्षणक्रम ७३

आहे. तात्पर्य, अशा बाबतींत मतभेद असणें हें जितकें स्वाभाविक आहे, तितकेंच तो राहाणेंही आहे असें वाटतें. दोनही पक्षाचे हेतु चागले असतील व दोहोंसही एकच विषय उद्देश्य असेल; तरीही पण त्या दोनही पक्षात साधनभेदामुळें मतभेद हा राहावयाचाच, व या दोनही पक्षांच्या तडजोडीनें जी सुधारणा होईल तीच कायमची असें आम्हीं समजतो. मतभेदासंबंधें हा सामान्य प्रकार झाला. आता स्त्रीशिक्षणाच्यासंबंधाने हा मतभेद कां पडतो याचा थोडासा विचार करूं. स्त्रियास शिक्षण दिलें असता त्या आपलीं कर्तव्यें करण्यास अधिक योग्य होतील, हें दोनही पक्षास कबूल आहे. परंतु आपल्या समाजांत तीं कर्तव्यें कोणतीं व आपल्या समाजाची बंधने मनात आणतां ती कर्तव्ये करण्यास कोणत्या प्रकारच्या शिक्षणाची आवश्यकता आहे व तें कोणत्या प्रकारें देता येईल या बाबतीत दोनही पक्षाच्या मतात बरेंच अंतर आहे. स्त्रीशिक्षणाची कल्पना आमच्या देशात जरी नवीन नाहीं, तरी तिचा उद्भव तरी इंग्रजी शिक्षणानें झाला आहे, असे म्हणण्यास कांही हरकत नाही. पूर्वी काही स्त्रिया पुरूषांप्रमाणे विद्यासंपन्न झाल्याची उदाहरणे आमच्या पुराणातून आढळतात. तथापि पुरूषांप्रमाणें स्त्रियास शाळात पाठवून तेथें त्यास 'उदार' शिक्षण देण्याची कल्पना आम्ही इग्रजापासूनच घेतली आहे; व इतर ज्या कल्पना आम्ही इंग्रजांपासून घेतल्या त्याच्या प्रथमावस्थेंत ज्याप्रमाणे आम्ही चकलो होतों, त्याप्रमाणें येथेंही स्थिति झाली आहे. इंग्रजी राज्य व विद्या जर आमच्या येथें आणखी शेंदोनशें वर्षे राहील तर आमच्यापैकी निदान इग्रजी विद्या शिकलेल्यांची गृहस्थिति इंग्रजी नमुन्यावर काही अशी जाईल याबद्दल आम्हास फारशी शंका किवा भीति वाटत नाही. मनुष्याची कोणतीही अवस्था स्थिर नसून तीत देश, काल व राजा यांच्या अनुरोधानें फेरफार झालाच पाहिजे. परतु समाजस्थितीचा विचार न करता एकदम दहापाच नव्या गोष्टी प्रचारात आणण्याचा प्रयत्न केला असतां तो कधींही सफल व्हावयाचा नाहीं. इंग्रज लोकाची गृहस्थिति निराळी व आमची निराळी, व त्या मानाने आम्हास शिक्षणही निरनिराळें पाहिजे. ज्या देशांत मुलींचे विवाह लहानपणीं न होता त्यास तरूणपणाचीं निदान कांहीं वर्षे तरी पितृगृहीं घालवावीं लागतात, त्या देशांत मुलींस काहीं धंदा किंवा विद्या येत असल्यास त्याचें ओझे आईबापावर पडत नाहीं, व विवाह उशिराने झाल्यामुळें एखादा धदा किंवा विद्या शिकण्यासही त्यांस पुष्कळ वेळ असतो. आपल्या देशांत ज्याप्रमाणें आपला मुलगा मोठा झाल्यावर तो आपल्या संसाराचे ओझें आपणावर पडूं देणार नाहीं अशी आपण अपेक्षा करितो, त्याचप्रमाणें अमेरिका किंवा इंग्लंडासारख्या सुधारलेल्या देशात एखाद्यास चारपाच अविवाहित मुली असल्यास त्या लग्न होईपर्यंत कांही तरी धंदा करून कुटुंबास मदत करितात व