पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/394

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इंग्रजी शिकलेल्यांचा एकांगीपणा. ३७९ हल्लींच्या परिस्थितीस अनुकूल नसल्यास त्यांत फेरफार करणें अवश्य आहे. व तो होईलही यांत शंका नाहीं. प्रश्न एवढाच आहे की, तो घडवून आणण्याकरितां कांहीं उद्योग केला पाहिजे की काय, आणि उद्योग करावयाचा तर तो कोणत्या दिशेनें करावा ? उद्योग बिलकूल करूं नये, होईल तें होऊं द्यावें असे म्हणणारे कांहीं लोक असतील, नाहीं असें नाहीं. पण हा पक्ष आम्हांस मान्य नाहीं, आमच्यांत आणि या बाबतींत उद्योग करणाच्या कांहीं लोकांत जो मतभेद आहे तो दिशसंबंधानें होय; आणि हा दिशेसेंबंधाचा मतभेद पुष्कळ ठिकाणीं अत्यंत महत्त्वाचा असतो हें लक्षांत येण्याकरितां गेल्या खेपेस कांहीं ठळक उदाहरणें सांगितलीं होतीं. धर्माच्या पायावर सुधारणा करण्यास गेले तर त्यास लोकांकडून यत्किचित्ही अडथळा येणार नाहीं असे आमचे म्हणणें आहे. आमची भिस्त अडथळ्यांवर नाहीं, दिशेवर आहे. आणि प्रो. रंगाचार्य यांनीं सांगितल्याप्रमाणे हा भद इतका महत्त्वाचा आहे कीं, त्यामुळे इतर दिशेर्ने उद्योग करणारांच्या चुका दाखविणें किंबहुना त्या उद्योगाचा निषेध करणें आम्हांस जरूर झाले आहे. कोणतीही सुधारणा घडवून आणणें असल्यास तें काम देशांतील सुशिक्षित वर्गानेंच पहिल्यानें हाती घेतले पाहिजे. केव्हांही झाले तरी सूर्याची पहिलीं किरणें उंच डोंगराच्या शिखरांवरच पडतात व तेथून तो प्रकाश उतरत उतरत खालीं दरींत येतो. प्रस्तुत प्रकरणास हाच न्याय लागू आहे. प्राचीन कालीं आमच्या धर्मीत व चालीरीतींत ज्या ज्या सुधारणा झाल्या आहेत त्या घडवून आणण्यास आचार्यासारख्या लोकांनींच प्रथमत: सुरुवात केलेली आहे. अगदीं अलीकडील उदाहरण घेणे असल्यास तें भागवतधर्माचे प्रवर्तक ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम यांचे घेतलें तरी चालेल. या पंथाच्या प्रवर्तकांमध्यें ज्ञान, वैराग्य, समताबुद्धि आणि धर्मश्रद्धा हे गुण किती व कसे जागृत होते हें महाराष्ट्रांत तरी सर्वास माहीत आहे. परंतु चमत्कार असा कीं, यांचीं उदाहरणें ढळढळीत आमच्या डोळ्यांपुढे असतांही आमच्या सामाजिक चालीरीतति अमुक एक फेरफार घडवून आणण्यास आम्हीं काय केले पाहिजे हें अद्याप आम्हांस कळत नाहीं, अथवा चमत्कार तरी कसला ? आम्हास सध्यां जें शिक्षण मिळत आहे तेंच अशा प्रकारचे आहे कीं, इसाबनातींतील समुद्रकांठीं चरणाच्या हरणाप्रमाणें आम्ही एकांगी होऊन कोणत्या बाजूनें आपणावर हल्ला येईल हेंच आम्हांस कळेनासें झाले आहे. जुन्या काळीं परकीय विद्येचा अभ्यास त्या वेळचे विद्वान् करीत नसत असें नाहीं. परंतु त्यामुळे आपली भाषा, आपला धर्म अगर धार्मिक रीतिभाती सोडून देण्याकडे कोणाची सहसा प्रवृत्ति होत नसे. जगन्नाथ पंडितासारखा एखादा दुसरा रंगेल पंडित केव्हां केव्हां निपजत असे; पण त्यासही अखेरीस गंगेस शरण जाण्याची बुद्धि होत असे. क्वचित्स्थलीं * शिव शिव न हिंदुर्नयवनः ’ असाही प्रकार होई. पण अशीं