पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/595

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लो० टिळकांचे केसरींतील लेख ५७८

 पुढें मांडण्याचें काम भट्ट मोक्षमूलर यांनीं सतत पंचावन्न वर्षे केलेले आहे, व त्यांनी ही जी मोठी कामगिरी बजाविली आहे त्याबद्दल प्राच्य देशांतील लोकांनीं त्यांचे किती ऋणी असले पाहिजे याची कल्पना त्यांचे ग्रंथ वाचल्याखेरीज कोणासही यावयाची नाहीं. संस्कृतांत हे प्रविण होते हे तर सांगावयास नकोच, पण त्याखेरीज, झेंद, पेहलवी, पार्शी,पाली किंबहुना जगांतील बहुतेक प्रमुख भाषा यांचा त्यांनीं थोडाबहुत अभ्यास केलेला होता व आपल्या आयुष्याची ५०/६० वर्षे सतत या अभ्यासांत घालावलीं होतीं. विद्यादेवीची इतक्या एकनिष्ठपणानें सेवा करणारे पंडित आमच्या देशांत प्राचीनकालीं पुष्कळ होत असत व सायणाचार्यासारखे तेराव्या शतकापर्यंत झालेले आहेत. पण मध्यंतरी ही परंपरा जी कमी झाली ती अद्यापही पूर्ववत जिवंत झाली नाहीं ही मोठ्या दुःखाची गोष्ट आहे. जर्मनीत जन्मून, पारिस येथे अभ्यास करून, व इंग्लंडांत राहून आपल्या अपूर्व बुद्धिवैभवाने, उद्योगाने, शेोधानें आणि ग्रंथलेखनानें सर्व जगास चकित करण्याची प्रो. मॅक्सम्यूलर यांस जी सवलत मिळाली ती दुस-या कोणा विद्वानास मिळाली नसती असें नाहीं. पण यांच्यासारखा विद्याभिरुचि असणारा व एकनिष्ठपणानें विद्याव्यासंग करणारा आमच्यामध्यें हल्लींच्या काळांत तरी कोणी नजरेस येत नाहीं ही मोठ्या दुःखाची गोष्ट आहे. हिंदुस्थानांतील आधुनिक विद्वानांनीं प्रो. मॅक्सम्यूलराच्या चरित्रापासून जर काहीं बोध घ्यावयाचा असेल तर हाच होय. राजकीय बाबतीत आम्हांस आमच्या अंगीं कितीही गुण असले तरी पुढाकार घेण्यास या राज्यांत संधि सांपडणें कठिण आहे; पण सर रिचर्डटेंपल यांनी सांगितल्याप्रमाणे विद्याव्यासंग, तत्त्वज्ञान, धर्मविचार किंवा शास्रीय शोध या बाबतीत आमच्या बुद्धीचा बराच उपयोग आम्हांस अद्याप करून घेतां येण्यासारखा आहे, व तेवढा जरी आमच्या विद्वानांनीं करून घेतला तरी त्यापासून देशाचे पुष्कळ कल्याण झाल्याखेरीज राहावयाचें नाहीं.

असो; प्रो.मॅक्सम्युलर यांची सर्वत्र प्रसिद्धि होण्यास वर जीं कारणें दिलीं आहेत, त्याखेरीज त्याचा सात्त्विक स्वभाव आणि विचारौदार्य हेंही एक आणखी कारण होय. नाना देश, नाना भाषा, नाना धर्म यांच्या इतिहासाचे सतत परिशीलन केल्यामुळे मॅक्सम्यूलरसाहेबाच्या स्वभावतः उदात्त बुद्धीचें 'वसुधैव कुटुंबकम्' या सिद्धान्तात पर्यवसान झालेले होतें. परधर्माची महती किंवा परभाषेचे सौंदर्य पूर्णपणे समजल्यानें स्वधर्मावरील किंवा स्वभाषेवरील श्रद्धा कमी होते असें नाहीं, हें प्रो. मॅक्सम्यूलर यांच्या चरित्रावरून विशेष शिकण्यासारखे आहे. प्रो. मॅक्सम्यूलर हे शेवटपर्यंत ख्रिस्तीच होते. पण त्यांचा खिस्तीधर्म अथवा विचार मिशनरी डबक्यांतील विचाराप्रमाणें स्तिमित झालेला नसून नाना भाषा व धर्म यांच्या परिशीलनाचा जो कांहीं त्याच्यावर योग्य परिणाम व्हावयास पाहिजे होता तो झालेला होता. हे त्याचे धर्मविचार विलायतेंतील कोत्या धर्मसमजुतीच्या मिशनरी लोकांस अप्रिय झालेले असून एकदां त्यांनी ऑक्सफोर्ड