पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/19

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


भारतातील वंचित विकास : प्रारंभ आणि विस्तार




 भारतीय समाज जीवन घडणीची स्वत:ची अशी धाटणी आहे. ते मानववंशशास्त्र, धर्मशास्त्र, संस्कृती बंध यांनी एकमेकांशी जोडलेले आहे. शिवाय भारतीय समाज धाटणीवर रूढी, परंपरा, चालीरीती, आचार-विचार पद्धती, खाण्यापिण्याच्या सवयी, पोषाख, दागिने या सर्वांचा मोठा परिणाम आहे. भारताचा पूर्वेतिहास आपण जेव्हा पाहू लागतो, तेव्हा आपणास असे दिसून येते की या देशात चहूदिशांनी अनेक लोकसमूह येत राहिले आहेत. ते कधी स्थलांतर, कधी व्यापार, कधी धर्मप्रसार तर कधी साम्राज्य विस्ताराच्या आमिषाने वा महत्त्वाकांक्षेने येत राहिले. येताना ते आपली भाषा, संस्कृती परंपरा घेऊन आले. त्याचाही परिणाम येथील तत्कालीन समाजजीवनावर झालेला आढळतो.
 कुटुंब संस्था, जातीव्यवस्था आणि ग्रामीण जीवन हे भारतीय समाजाचे मूलाधार होत. ते येथील व्यक्तिसमूहांना संगठित करतात. त्या संघटिततेचे आधार येथील जात वास्तव, धर्म परंपरा असतात. भारतीय समाजजीवनाचा पाया शेतीवर आधारित अर्थव्यवस्था आहे. इथे पूर्वी बलुतेदारी पद्धती होती. त्यांची जागा सहकारी चळवळीने घेतली तरी ग्रामीण जीवनातलं परस्परावलंबन पूर्वीचेच राहिलेले आहे. भारतीय समाजजीवनाचा स्थायीभाव सर्वसमावेशकता असल्याने येथील समाजांनी विविध प्रदेश व परदेशातून आलेल्या व्यक्तिसमूहांनीही आपल्यात सामावून घेतले आहे. इथली सारी स्थावर, जंगम संपत्ती असो वा पारंपरिक व्यापार, व्यवसाय, हक्क, अधिकार, पदे असतो त्यावर वंशपरंपरेचे मोठे वर्चस्व आढळते. त्यातून मग इथे हक्क आणि कर्तव्याच्या जाणिवाही पूर्वापार रुजत आलेल्या आहेत. इथल्या चातुर्वण्य व्यवस्थेचा समाजजीवनावर जसा प्रभाव व परिणाम आहे, तसा तो येथील कृषी, व्यापार, समाज व्यवहार, पंचायत व्यवस्था, प्रशासन यावरही तो दिसून

वंचित विकास जग आणि आपण/१८