पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/१६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----

येते. याचे फूल हिरव्या रंगाचे असून फळ कठीण कवचाचें ब सुमारे आंब्याएवढे मोठे असते. त्याला बेलफळ असे म्हणतात. दशमूळाचे काढ्यामध्ये बेलमूळाची योजना केलेली आहे. तसेच मेदोरोगावर जो बिल्दादि काढा देतात, त्यामध्येही बेलमूळाची योजना केलेली असते; हे खालील श्लोकावरून दिसून येईल.

  बिल्वोऽग्निमंथः श्योनाकः काश्मरी पाटला तथा।
  क्वाथ एषां जयेन्मेदोदोषं क्षौद्रेण संयुतः ॥ १ ॥
       शार्ङगधर.

 म्हणजे बेल, ऐरण, टेंटू, शिवण, व पाडळ, या पांच औषधांचा काढा मध मिळवून घेतला असता मेदोरोग दूर होतो. बेलफळांतील गर गुळाबरोबर खाल्ल्यास आमांशाचा विकार बंद होतो. असे या झाडाचे अनेक औषधी उपयोग आहेत; परंतु त्यासंबंधाने विशेष विचार न करितां आतां आपण बेलाच्या झाडाला दरवर्षी जी हजारों फळे येतात, आणि ती पिकल्यानंतर झाडाखाली पडून जागच्या जागी सुकून कुजून जातात, त्या वेलफळांपासून औषधाशिवाय कोणते उपयुक्त जिन्नस मिळण्यासारखे आहेत ते पाहूं.

 बेलफळे कोंवळी असतात, तेव्हा त्याची भाजी व लोणचे करतात. गरीब लोक फळे पिकल्यावर आंतील गर खातात. तो गुळमट असतो. मातीच्या चित्रांना रंग देण्याकरितां जे रंग तयार करतात, ते तकाकण्याकरितां त्यांत डिंकाचे पाणी घालावे लागते. रंगाला तकाकी आणण्याचे हे काम बेलफळापासूनही होण्यासारखे आहे. चांगली पक्व झालेली बेलफळे घेऊन ती कापून त्याची दोन दोन शकले करून ती रुंद ताटांत अगर परातीत उपड़ीं घालन ठेवावी, म्हणजे थोड्याच वेळात त्यांतील चिकट रस भांड्यांत जमतो. तो काढून डिंकाचे पाण्याचे ऐवजी रंगांत घालून तो रंग चित्रांना दिल्यास रंग चांगला तकाकतो. अशा प्रकारे फुकटांत मिळणाऱ्या या रसाचा रंगाचे काम उपयोग करून घेतल्यास डिंकास लागणारा खर्च वाचविता येईल. तरी मातीची चित्रे रंगवणारांनी याचा अनुभव घेऊन पहावा. याशिवाय बेलफळांचा व्यापारसंबंधी दुसराही एक मोठाच उपयोग होण्यासारखा आहे. बेलफळे पिकल्यानंतर ती झाडावरुन काढावी; नंतर सुरीने प्रत्येक फळांची दोन दोन शकले करून त्यांतील गीर व बी साफ काढून टाकावे. आणि ती शकले सुकू द्यावी. सुकल्यानंतर त्यांच्या आकाराच्या मानाने डब्या, वाट्या, चमचे, मुलांचे खुळखुळे व वाजविण्याची भिरभिरी वगैरे जिनसा कराव्या. सदर्हू जिनसांना रंग देऊन वेलबुट्टी वगैरे काढल्यावर त्या