पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/१९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

      वड, पिंपळ व नांद्रूक.      

-----

उन्हाळ्यांत रुईच्या झाडाची मुळे काढून आणून त्यावरील साल काढून घ्यावी. नंतर ती साल उन्हात वाळवून तिचे चूर्ण करून ठेवावे. या चूर्णाचा वातरक्त, उपदंश, ज्वर, वगैरे विकारांवर उपयोग करतात. हे चूर्ण व जेष्ठमध एकत्र करून घेतल्यास खोकला, ग्रंथी व त्वचारोग नाहीसे होतात. रुईच्या पानाला तेल, तूप अगर एरंडेल लावून अंग शेकण्याचे काम त्याचा उपयोग करतात. कान ठणकत असेल तर पानाचे रसाचा ठिपका कानांत घालतात. सुवर्णादि धातुंचीं भस्में करण्याचे कामीं रुईचे चिकाचा उपयोग होतो. असे या झाडाचे अनेक औषधी उपयोग आहेत.

 आतां या झाडाचे व्यापारसंबंधी काय उपयोग आहेत ते पाहू. या झाडाच्या सालीचे तंतु काढून त्याचे दोर तयार करतात. तंतू काढण्याचे काम फारसे अवघड नाहीं. झाडे कापून आणून त्यांस एक दोन उन्हें द्यावी. म्हणजे वरील हिरवी साल सहज सोलून काढता येते. ती साल ठेचून व स्वच्छ धुवून पांढरी करावी. नंतर तिचे बारीक बारीक धागे मोकळे करावे, हेच याचे सुत. या सुताचे दोर पाण्यांत लवकर कुजत नाहीत आणि म्हणूनच मासे धरण्याच्या गळास कांही लोक या दोरांचा उपयोग करतात. मांदाराच्या सुताला बाजारांत चांगला भाव मिळतो. पंजाब, मद्रास, वगैरे ठिकाणी सालीच्या आंतील भागाचा कागद करण्याकडे उपयोग करतात. रुईच्या झाडाला जी बोंडें येतात, त्या बोंडांतून रेशमासारखा मऊ कापूस निघतो. लंडनमध्ये या कापसाची फ्लानेल करण्याचे प्रयत्न चालू आहेत. मांदार व रुई यांचा कापूस सावरीचे कापसापेक्षाही थंड आहे, असे म्हणतात. या झाडाच्या चिकाचा चामडी रंगविण्याकडे उपयोग करतात. हाच चीक उकळवून घट्ट केला असतां गोंदाप्रमाणे एक चिकट पदार्थ तयार होतो. रबर करण्याचे कामीं या चिकाचा उपयोग होण्यासारखा आहे. या झाडांच्या लाकडाचा कोळसा हलका असल्यामुळे आतषबाजीची दारू तयार करण्याचे काम त्याचा उपयोग होतो. या झाडाचे व पानाचे खत वाळवीचा नाश करणारे आहे.

--------------------
६ वड, पिंपळ व नांद्रूक.

 वड व पिंपळ ही झाडे आपल्या देशांत सर्वत्र असुन त्यांची सर्वांना ओळख आहे. निदान आम्हां हिंदूलोकांस तरी ती पूर्णपणे ठाऊक आहेत. कारण आम्हां हिंदूलोकांच्या बायका वड व पिंपळ या झाडांची पूजा करतात. ज्येष्ठ मासांतील पूर्णिमा हा वटवृक्षाच्या पूजेचा दिवस व श्रावणी शनिवार हा अश्वत्थवृक्षाच्या पूजेचा दिवस. तसेच गीता अ० १० श्लोक २६ यांत भगवान