पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/३९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

      पोपया.      २९

-----

प्रमाणे उपयोग होतो. देशावर शाळेत जाणारी लहान मुलें बोरूऐवजी शाळूच्या ताटांचा लेखण्या करण्याचे कामीं उपयोग करतात.

--------------------
२० पोपया.

 पोपयाची झाडे उष्ण प्रदेशांत पाहिजे त्याठिकाणी होतात. पोपयाचे मूलस्थान अमेरिकाखंड असावं, असा विद्वान् लोकांचा तर्क आहे. ही झाडे उकिरड्यावर सुद्धा आपोआप वाढतात. हे झाड दहा बारा हातपर्यंत नीट, सरळ वाढत जाते. त्यास आडव्या तिडव्या डाहळ्या फुटत नाहींत, शैड्याला एरंडाच्या पानाच्या आकाराची, परंतु त्यापेक्षां फार मोठमोठाली व लांब पोकळ देठाची अशी पाने येतात. पोपयाचे लाकूड फारच ठिसूळ आहे. यामुळे तें कोणत्याही कामास उपयोगी पडत नाही. या झाडांत स्त्री आणि पुरुष अशा दोन जाती आहेत. त्यापैकी स्त्रीजातीच्या झाडाला मात्र फळे येतात. नरमादी एकत्र असली म्हणजे मादीला फार फळे येतात. ही फळे नारळासारखी पानांच्या खाली लागतात. झाड लावल्यापासून तीन वर्षांनी फळे येऊ लागतात. ही फळे बारमहा येतात. हिरव्या फळाची भाजी करतात. पिकलेली फळे खाण्याच्या उपयोगी पङतात. ही फळे फार खाल्ली असतां खरूज वगैरे विकार उत्पन्न होतात. उन्हाळ्यांतील फळे रुचकर असतात. सिद्धी लोक कपडे धुण्याकरितां साबणाऐवजी पोपयाच्या पानांचा उपयोग करतात. पानथरीवर व काळीज फुगले असता त्यावर पोपयाच्या फळाचे पोटीस करून बांधावे व फळांच्या सालीतून निघणारा पांढरा चीक चमचाभर साखरेत मिश्र करून दिवसांतून तीन वेळ याप्रमाणे दिल्यास खात्रीने गुण येतो. असा डॉक्टर इव्हस यांचा अनुभव आहे. याच पांढऱ्या चिकाने पोटांतील कृमींचा नाश होतो. हा चीक देणे तो मोठ्या मनुष्यास मधाबरोबर दोन चमचेपर्यंत व लहान मुलांस दोन चार थेंब दिले म्हणजे पुरे होतात. जरूर तर वर थोडेसे एरंडेल पाजावे. पोपयापासून अन्नपाचक व पौष्टिक असे ' पेपसिन ' नांवाचे औषध तयार करतात. औषधासंबंधांत या झाडाचे आणखीही दुसरे उपयोग आहेत. परंतु याचा एक विशेष उपयोग आहे, तो सांगून हा भाग पुरा करू. कोणत्याही जनावराचे मांस शिजत नसले तर पोपयाच्या फळांतून दुधासारखा जो पांढरा चीक बाहेर येतो; तो त्या मांसांत मिश्र करून मग तें मांस शिजवावे. म्हणजे कसलेही न शिजणारे मांस असले तरी ते इतके नरम होते की, मांसाचे तंतु भांड्यांत गळून पडतात. चिकाऐवजी पोपयाच्या फोडी करून टाकल्यानेही वरील कार्य होते, मात्र पिकलेल्या