पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/६६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५६      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----

उपयोग होतो. आणि याच कामासाठी आपल्या देशांतून दरसाल हजारों खंडी हिरडा परमुलखी रवाना होत आहे. मायफळापेक्षां हिरड्यांत ट्यॅनिक अॅसिडाचे प्रमाण ज्यास्त असते आणि या कारणामुळेच हल्ली मायफळाचे ऐवजी हिरड्याचाच खप होऊ लागला आहे. सुती कपड्यांवर गडद काळा रंग देण्याकरितां लोखंडाचा सल्फेट (हिराकस) त्यांत मिश्र करतात. तुरटी व हिरड्याची पूड यांच्या मिश्रणाने छिटांना पक्का पिवळा रंग देता येतो. हिरड्याच्या कषायात हळद मिसळल्याने हिरवा, काताने तांबूस आणि देशी पतंगाने लाल रंग होतो. हिरड्याचा कषाय करतांना हिरड्यांतील बिया काढून टाकाव्या लागतात. मंजिष्ठाचा रंग देण्यापूर्वी कपड़ा हिरड्याच्या द्रवांत प्रथम बुडवून काढावा लागतो. हिरड्यापासून उत्तम उत्तमप्रकारची काळी शाई करितात, हिरडे फोडून त्यांची टरफलें लोखंडाच्या भांड्यांत पाणी घेऊन त्यांत टाकतात व ते भांडे चार दिवस तसेच ठेवितात, नंतर त्यांत हिराकसाची पूड टाकून तो द्रव गाळतात, म्हणजे काळी शाई तयार होते. हिराकसाची पूड न टाकल्यास शाई फिक्कट होते. शाई बोळू नये या करितां त्यांत कार्बालिक अॅसिडाचे कांहीं थेंब टाकावे.

  हरीतकीशंखधनद्रवांबुभिर्गुडोत्पलैः शैलकमुस्तकान्वितैः ।
  नवांतपादादिविवर्धितैः क्रमात् भवंति धूपा बहवो मनोहराः॥ १॥
 हा श्लोक उदबत्ती संबंधाच्या माहितीच्या एका जुनाट ग्रंथांतील आहे. ह्यावरुन पाहतां निरनिराळ्या प्रकारचे मनोहर असे धूप तयार करण्याचे कामींही हरीतकीचा म्हणजे हिरड्यांचा उपयोग विशेषतः करतात. असे दिसून येते.

--------------------
३७ एरंड.

 एरंडामध्ये कडवा आणि गोडा अशा दोन मुख्य जाति आहेत. गोड्या एरंडास सुर्ती एरंड व कडव्यास मोगली एरंड असे म्हणतात. कडव्या एरंडाचा फारसा उपयोग नाही. त्याचा उपयोग विशेषतः कुंपणाकरितां होतो. आपण प्रथम गोड्या म्हणजे सुर्ती एरंडाबद्दलच विचार करु, सुर्ती एरंडामध्यें तांबडा व पांढरा अशा दोन पोटजाति आहेत. तांबड्या एरंडाचा दांडा व फूल तांबडे आणि पांढऱ्याचा दांडा व फूल हिरवट पांढरे असते. एरंडाचे झाड सरासरी पुरुषभर उंच वाढते. हे झाड पोकळ व ठिसूळ असल्यामुळे याचा विशेष उपयोग होत नाही. गुळाच्या भट्टीखाली जाळण्यास कांहीं लोक या झाडांचा उपयोग करतात. या झाडाचा कोळसा हलका असल्यामुळे दारू तयार करण्या कामी त्याचा उपयोग होतो. या झाडाची पाने मोठी असून त्यात कात्रे असतात, झाडाला सुपारीएवढालीं फळे येतात. त्यावर मऊ कांटे असतात. या फळात