पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/७३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

      केवडा.      ६३

-----

कातारी लोक केवड्याच्या पानांनी लाकडावर बसविलेला लाखेचा रंग सारखा करतात. कर्नाटकांत या पानांच्या हातऱ्या, छत्र्या वगैरे जिन्नस करतात. केवड्याच्या पानांपासून धागेही निघतात. या धाग्यांचे दोर, जाळीं, पोती वगैरे जिनसा तयार करतात. केवड्याच्या अंतरिक्ष मुळयांचे रंग देण्याकरितां कुंचे करतात. केवड्याच्या झाडाला जे तुरे येतात, त्यांत त्याचे कणीस किंवा फूल असते. कातगोळ्या सुवासिक करण्याकरितां त्या केवड्याच्या कणसांत घालून ठेवतात. या कणसाच्या आंत खसखशीसारख्या बियांचे तुरे येतात. त्यांस कांजीण असे म्हणतात. या कांजिणीची भाजी करितात, केवड्याची कणसे काढणे हे काम बऱ्याच त्रासाचे आहे. कारण एक तर या झाडाच्या पातींना तीक्ष्ण कांटे असतात; शिवाय केतकीच्या बनामध्ये सर्पांची वस्ती असते; सबब कणसे काढणारांनी वरील दोन्ही गोष्टीबहुल विशेष सावधगिरी ठेवून कणसे काढावी, उंची कपड्यांना सुवास येण्याकरितां त्यांत केवड्याच्या कणसाच्या पाती घालून ठेवण्याची पद्धत आहे. केवड्याच्या कणसापासून उत्तम प्रकारचे सुवासिक अत्तरहि काढितात; त्यास केवड्याचे अत्तर असे म्हणतात.

 अशा प्रकारे केवड्याच्या झाडापासून व्यापारोपयोगी अनेक जिन्नस तयार करितां येतात. आमच्या इकडे बऱ्याच लोकांना ज्या वनस्पति दिसण्यांत अगदी क्षुल्लक व निरुपयोगी वाटतात, अशा वनस्पतींपासूनही उद्योगी मनुष्याला अल्प भांडवलाने व्यापारोपयोगी जिन्नस कसे तयार करता येतील हे दाखविण्याचा या छोटेखानी पुस्तकांत जो अल्प प्रयत्न मी केला आहे, त्या दिशेने वाचकवर्गापैकीं कांही इसम तरी जर प्रयत्न करून पाहतील, तर माझ्या या श्रमाचे सार्थक झालें असेंच मी समजेन.

 असो. शेवटीं ज्या दयाघन प्रभूच्या कृपेने हें छोटे पुस्तक पुरे करून वाचकांना सादर करतां आलें, त्या जगन्नियंत्याचे चरणी अनन्यभावें लीन होऊन तूर्त वाचकांची रजा घेतो.