हे पान प्रमाणित केलेले आहे.

म्हणजे ५००० वर्षांचा विकास समजून घेताना लक्षात येते की, लेखन विकास झाला नसता तर जगच विकसित झाले नसते. पूर्वसुरींनी लिहून ठेवलेले वाचत माणसाने प्रत्येक क्षेत्रात क्रांतीच नाही, तर उत्क्रांती घडवून आणली. ‘इष्टिका ग्रंथ' ते 'ई-बुक'चा प्रवास केवळ थक्क करणारा. तो तुम्ही मुळातूनच वाचायला हवा. कोरणे, लिहिणे, ठसे, मुद्रण नि आता डिजिटल, व्हर्म्युअल होणं माणसाच्या निरंतर विकासाचाच ध्यास नि धडपड ना?  या सर्व पार्श्वभूमीवर वाचन समजून घेणं म्हणजे ज्ञान साधन विकासाचे वरदान समजून घेणं होय. लहान मुलं वाचतात नि मोठी माणसंही. हौशी वाचक वाचतात नि एखादा संशोधक, साहित्यिक, समीक्षक, बुद्धिवंत, विचारवंत वाचतो ते एकच नसतं. ते समजून घ्यायचं तर वाचन प्रक्रिया, प्रकार समजून घ्यायला पाहिजेत. शब्दशः वाचन, सार्थ वाचन, सव्यसाची वाचन या वाचनाच्या परी समजून घेतल्या की लक्षात येतं की, सत्यनारायणाची पूजा ऐकणं, पोथी वाचणं नि विश्वकोश वाचणं यात काय फरक असतो? आपण वेळ घालविण्यासाठी वाचतो की सत्कारणी लावण्यासाठी, यातला फरक तुम्हाला हे पुस्तक समजावेल. म्हणूनही ते तुम्ही मोठ्या जिज्ञासेने आणि चिकाटीने वाचायला हवे. तुम्हाला प्रगल्भ वाचक व्हायचे तर हा ‘वाचन'ग्रंथ वाचण्यास पर्याय नाही.  सदर पुस्तकाचे प्रकाशन भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूरने केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.

१ जून, २०१८
डॉ. सुनीलकुमार लवटे
 

हेलन केलर स्मृतिदिन