पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/136

हे पान प्रमाणित केलेले आहे.

चंद्रमोहन कुलकर्णीच्या चित्रांनी साकारली आहे. प्रारंभीच आस्वाद घेणारा लेख असून तो वाचनीय अशासाठी आहे की हा लेख माणसांच्या जीवनात असलेले साहित्य, कला, संगीत, शिक्षण नि शिक्षकाचे महत्त्व अधोरेखित करतो. या अंकात न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरांचा काँग्रेसचे तत्कालीन सरचिटणीस व संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अग्रणी गांधीवादी कार्यकर्ते शंकरराव देव यांच्यावरील व्यक्तिविश्लेषण करणारा लेख आजच्या राजकीय कार्यकर्त्यांनी अशासाठी वाचायला हवा की माणसास केव्हातरी आपल्या कार्याचा प्राधान्यक्रम ठरवावा लागतो जी माणसं जीवनातलं सर्व छोट्या ओंजळीत गोळा करण्याचा आटापिटा करतात अशांची ओंजळच रिकामी राहात नाही तर जीवनही उपेक्षा नि अनुल्लेखाचं राहतं. यातील कथा, ललित लेख, कविता समकाल कवेत घेणाऱ्या नि म्हणून अधिक प्रभावी ठरणारा हा अंक मुळातूनच सर्व वाचायला हवा.

 साप्ताहिक 'साधना'ने यावर्षीही बालकुमार, युवा नि प्रौढांसाठी स्वतंत्र दिवाळी अंक प्रकाशित करून सर्व वयोगटातील वाचकांमध्ये वाचन वृत्ती विकासाचे ध्येय ठेवून तीन दिवाळी अंक प्रकाशित करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. साधना बालकुमार अंक हा विक्रमी विक्री करणारा दिवाळी अंक म्हणून महाराष्ट्रभर मान्य झाला असून यावर्षी त्याची विक्री नोटाबंदी व जीएसटीच्या अडथळ्याची शर्यत पार करूनही दोन लाख होते हे शिक्षक, शिक्षणाधिकारी करत असलेले सांस्कृतिक कर्तव्य म्हणून महत्त्वाचे ठरते. यावर्षी साधनेने बालकुमार अंकात ब्रिटन, केनिया, पाकिस्तान, कॅनडा, मलावी, भारत अशा वैविध्यपूर्ण देशांतील ८ ते १६ वयोगटातील आंतरराष्ट्रीय दखलपात्र बालकुमारांची यशोगाथा शब्दबद्ध करून 'तुमचा आदर्श तुमच्यापुढे' असा आरसा दाखवला आहे. युवा अंकात विनायक पाचलग, रामचंद्र गुहा, मनीषा कोईराला, चिमामांडा एन्गोझी प्रभृती मान्यवरांनी सोशल मीडिया, ज्योतिषाचे वैयर्थ्य, नृत्य, गणित, स्त्रीवादाविषयी युवकांचे प्रबोधन केले आहे तर प्रौढ अंकात साधनाने गोविंद तळवलकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विशेष लेख प्रकाशित केले आहेत.

 दैनिकांची दिवाळी अंकांची परंपरा तशी अलीकडची पण अल्पावधीत 'लोकमत'च्या 'दीपोत्सव'ने 'दिवाळी अंकांचा राजा' बनण्याचा बहुमान संपादून 'मराठी दैनिक नंबर एक' प्रमाणे दिवाळी अंकातही अव्वल स्थान पटकावले आहे. आर्ट पेपरवर छपाई, उत्कृष्ट मजकूर व मांडणी ही या अंकाची जमेची बाजू. यातला 'पॅडमन' हा शर्मिष्ठा भोसलेंचा लेख सर्व

वाचावे असे काही/१३५