पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/21

हे पान प्रमाणित केलेले आहे.

ऐवज - संपा. अरुण शेवते ऋतुरंग प्रकाशन, मुंबई प्रकाशन-२०१० पृ. ६८०, किंमत रु. १०००/-


ऐवज

 माणूस जगण्यासाठी खातो आणि सुसंस्कृत, प्रगल्भ होण्यासाठी वाचतो. सकस अन्न शरीरास पुष्ट करते. म्हणून चौरस आहारास पौष्टिक मानले जाते. तसे आपले वाचनही चतुरस्त्र हवे. ते आपणास चतुर, व्यासंगी बनवते. माणसे काहीही वाचून वेळ वाया घालवतात. खरे तर असे नको व्हायला. वाचनात निवड हवी. सारासार विवेक हवा. भारंभार प्रकाशित होण्याच्या आजच्या काळात मी असे पाहतो आहे की माणसे वाचनाऐवजी पाहण्यात वेळ वाया घालवतात. चॅटस्, मेसेजिस, क्लिप्स, कोटेशन्स, पिक्चर्स, मेल्स इ. मोबाईल्स, संगणकावरील हवी-हवीशी वाटणारी सामग्री क्षणिक महत्त्वाची खरी. पण क्षणाक्षणाने दिवस निघून जातात. आणि मन आणि मेंदू रिकामाच राहतो. क्षणिक रंजनाने माणसे नाही घडत. सातत्यपूर्ण वाचन, विचार आणि आचारातून माणूस आकारतो.

 महाराष्ट्र संस्कृतीचे एक वैशिष्ट्य तुम्हास कुठल्यास राज्यात, राष्ट्रात पाहता येणार नाही. ते म्हणजे आपले दिवाळी अंक! मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीच्या प्रांगणात दिवाळी अंकांची परंपरा सन १९०९ मध्ये सुरू झाली. त्यालाही पाहता-पाहता शंभर वर्षे होऊन गेली. 'मनोरंजन' नावाचे एक मासिक त्या वेळी निघत असे. त्याचे संपादक होते काशिनाथ रघुनाथ मित्र.

वाचावे असे काही/२०