पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/60

हे पान प्रमाणित केलेले आहे.

टोक करण्यासाठी अर्ध ब्लेड देणारा, अर्धा खोडरबर देणारा, विसरल्यावर ड्रॉईंगच्या तासाला ताव, रंग, ब्रश, करकटक, पट्टी देणारे मित्र आठवतात. आणि आठवतात आपल्यासाठी खोटं बोलून पट्टीचा गुरुजींचा मार आपल्या तळहातावर सोसणारे जिगरी दोस्तही! प्रत्येक शिकलेल्या माणसाच्या जीवनात पाठ्यपुस्तके सरल्या ऋतूंचं वास्तव असतं नि असतं न विसरू शकणाऱ्या आठवणींचं मोहोळ! माझ्या संग्रही अशी सर्व पुस्तके आहेत. नंतर मी शिक्षक झालो. मी शिकवलेली पाठ्यपुस्तकेही माझ्या संग्रही आहेत. मी एकविसाव्या वर्षी शिक्षक झालो तेव्हा माझी पहिली बॅच धोक्याच्या वयाची, षोडशवर्षीय होती. त्यांच्या नि माझ्या वयात सहा-आठ वर्षांचंच अंतर. परवा साठीत असलेली ही मुलं मुली घरी आली. मिळून मी शिकवलेली कविता म्हणून आठवणींना उजाळा देत निघून गेली.

◼◼

वाचावे असे काही/५९