हे पान प्रमाणित केलेले आहे.

माझी आई : ११

माझी आई कष्टाळू म्हणून जशी प्रसिद्ध, तशीच रागीट व भांडखोर म्हणूनही प्रसिद्ध आहे. आईचे सासरचे नाव गंगा. " गंगाबाई म्हणजे आग रे, बाबा." असे म्हणताना मी अनेकांना ऐकले आहे. आमच्या बाबांशी ती कमी भांडली नाही. बाबांच्या शब्दांत सांगायचे म्हणजे 'इंजिन सुरू होते.' तोंडाचा पट्टा आणि कामाचा झपाटा एकसाथ चालू होता.
 पण या भांडकुदळपणाबाबत मला दोन-तीन आश्चर्ये आढळली. प्रथम म्हणजे ती गल्लीत अतिशय लोकप्रिय आहे. दोन वेळा तर खूप मते घेऊन ती नगरपालिकेत निवडूनसुद्धा आली. गल्लीतील स्त्रिया तिला चाहतात, मानतात. ती काही शिकलेली नाही. राजकारणात तिला काही कळत नाही. पण बाबा राजकीय नेते होते. ही नगरपालिकेत गेली. इतकी भांडखोर बाई इतकी लोकप्रिय कशी, हा आश्चर्याचा भाग आहे. मी तिला भांडताना पाहिले आहे. पण भांडण बाहेरच्याशी फार कमी; म्हणजे पाचसहा वर्षातून एखादे वेळी व्हायचे. घरी मात्र अधून मधून ती बाबांशी सतत भांडे. या भांडणांचा बाबांना कधी राग आलेला नाही. ते म्हणत, " तिच्या भांडणाला कारणे दोन. एकतर तिला अन्याय सहन होत नाही. दुसरे म्हणजे प्रेम. आणि प्रेम मुले, नवरा यांविषयी. बरे तिची बाजू बरोबर असते. मग ती भांडणार." म्हणजे ज्यांच्याशी तिला भांडताना आम्ही नेहमी पाहिले ते गृहस्थ तिचे तरफदार !
 मला लग्नानंतर एक लहानशी चिंता होती. माझी पत्नीही स्वभावाने रागीट. आईही रागीट. या दोघींचे जमणार कसे ? पण तेही एक आश्चर्य आहे. सासू-सुना गेल्या पंचवीस वर्षांत कधीही भांडल्या नाहीत. तरीही माझ्या आईची प्रसिद्धी भांडखोर म्हणून आहे. आई म्हणते, "अरे, कोण कोणाशी उगीच भांडतो? मी जर भांडखोर असते तर इतकी माणसे कशी जोडली असती? कानफाटया नाव पडले म्हणजे पडले." कधी कधी ती म्हणते, " कोण रे, तो मला भांडखोर म्हणणारा ? आण बरे माझ्यासमोर. आत्ता त्याची खोड मोडते." आणि मग ती खळखळून हसते. माझ्या आईचे हसणे मोठे प्रसन्न, मनमोकळे आहे. तिला विनोदही चांगला कळतो. मला तिचे हसणे फार आवडते. सर्व दुःखे पचवून आपली प्रसन्नता टिकविणाऱ्या एका कर्तबगार माणसाचे ते हसणे आहे.
 आईच्या काही कल्पना मोठ्या मजेदार आहेत. म्हणूनच मी तिच्या प्रेमळपणाविषयी बोलत नाही. सगळया स्त्रिया प्रसूत होतात. त्यांना मुले होतातच. मुलांना सर्वजणीच पाजतात, जेवू घालतात. सर्वच स्त्रियांना मुलांची दुखणी निस्तरावी लागतात. यांत प्रेम प्रेम ते काय असते ? सगळ्याजणी करतात तेच मी केले, तर त्यात मुद्दाम सांगावे असे तरी काय ? आणि कौतुक करावे असे तरी काय ? आई प्रेमळ आहे या कल्पनेचे तिला कौतुक वाटत नाही. आईने प्रेम करावे, मुलाचे हजार अपराध पोटात घालून क्षमा करावी, त्याच्या सर्व दोषांवर पांघरूण घालावे