हे पान प्रमाणित केलेले आहे.

३० : वाटचाल

यांना आपले आद्य अभिमानकेन्द्र मानत आलेले आहेत. हे माझे मोठे मामा अतिशय देखणे, गोरेपान, हजारांत सुंदर अशा व्यक्तिमत्त्वाचे होते. ते विद्वान होते तसे व्यायामपटूही होते. आमच्या मोठ्या मामी दिसण्यातही साधारण होत्या. शरीर प्रकृतीनेही अशक्त होत्या. पण मामांनी मोठ्या प्रेमाने व निष्ठेने त्यांच्याशी संसार केला. या आत्मवृत्तात माझे ' मोठे दीर' म्हणून उल्लेखिलेले ते हे मामा होत. या माझ्या मामांनी आपल्या घरी आईच्या बहिणीची मुले, बापाच्या बहिणीची मुले, स्वतःच्या बहिणीची मुले अशा सर्वांचे शिक्षण केले. भावांची शिक्षणे तर त्यांनीच केली. या मोठ्या मामांनी सगळे घरच पुढे आणले. उरलेल्यांनीसुद्धा कधी त्यांचा शब्द खाली पडू दिला नाही. आवडो न आवडो आमच्या मोठ्या मामांचा शब्द कधी खुषीने तर कधी कुरकुरत प्रमाण मानला.
 माझे मधले मामा रामचंद्रराव नांदापूरकर. यांना घरची वडील माणसे 'रामा' म्हणत. आणि सर्व धाकटी माणसे 'दादा' म्हणत. तीन नांदापूरकर भावांच्यामध्ये हे माझे मधले मामा सर्वात बुद्धिमान, सर्वांत रागीट आणि चिडखोर, सर्वांत दिलदार आणि उदार, सर्वांत कर्तबगार असे होते. वडील मामा नसते तर दादांचे शिक्षण झाले नसते. कुठे तरी एक रागीट, भांडकुदळ कारकून म्हणून त्यांचे आयुष्य गेले असते. ही गोष्ट खोटी नाही. मोठे मामा होते म्हणून दादा शिकू शकले हे खरेच आहे. पण मोठे मामा फार तर शिकण्याची सोय करणार. बुद्धिमत्ता मोठे मामा कुठून आणणार? बुद्धिमत्ता आणि हट्टीपणा हे दादांचे अंगभूत गुण होते. दादा शालेय जीवनातही अतिशय बुद्धिमान विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या त्या वेळच्या बुद्धिमत्तेची वाखाणणी आजतागायत त्यांचे वर्गमित्र करीत आले आहेत. दादा विज्ञानाचे विद्यार्थी होते; पण वाङमय, तत्त्वज्ञान आणि काव्य यांविषयी त्यांना रुचीही भरपूर होती. त्यांचे वाचनही चौरस असे, वक्तृत्वही फार चांगले होते. मी दादांची कुशाग्र बुद्धिमत्ता आणि चौफेर अभ्यासाची पद्धत पाहिलेली आहे. पण त्यांचे ऐन तारुण्यातले बहारदार फुललेले वक्तृत्व माझ्या प्रत्यक्ष ऐकीवात आले नाही. पण मोठे मामा सांगत, दादा ' नीतीचे स्वरूप ' या विषयावर एकदा बोलले होते. आदल्या दिवशी तरुणांची सभा होती, दुसऱ्या दिवशी याच विषयावर वामन मल्हार जोशींचे हैद्राबादला व्याख्यान होते. मोठे मामा सांगत, " अरे, वामन मल्हारांचे अर्धे व्याख्यान रामाच्या भाषाशैलीची, त्यांच्या बुद्धीची आणि व्यासंगाची स्तुती करण्यातच संपले." वामन मल्हार तरुणांचे कौतुक करणारे, हे तर खरेच. पण माझे मामाही तसे कौतुक करण्याजोगे असणार, यात वाद नाही. दादांचे मी जे वक्तृत्व ऐकले त्यात बुद्धी, व्यासंग, तर्ककठोरपणा हे गुण होते. प्रौढपणे, प्रत्येक प्रश्नावर जबाबदारीने बोलायचे, हे बंधन आल्यामुळे त्या वक्तृत्वाचा आवेशपूर्ण फुलोरा आम्हाला पाहायला मिळाला नाही.