हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रभावती कुरुदकर : ४५

मी पत्नीला पुरवणी परीक्षेला वसविण्याच्या तयारीस लागलो. एक दिवस प्रभा व तिची मैत्रीण बोलत होत्या. मी शेजारच्या खोलीत आहे याची तिला कल्पना नव्हती. मैत्रिणीने विचारले, "काय ग प्रभा, कधी नापास न होणारी तू. या वेळी नापास कशी झालीस ?" शत्रुपक्ष वयाने फार लहान आणि चतुरपणात फार ज्येष्ठ होता. बाईसाहेबांनी उत्तर दिले, " अग, तीच तर गंमत आहे. तो मला नोकरीत अडकवून स्वतः मोकळा राहू इच्छितो. माझा संसार धड व्हायचा तर त्याला बांधणे आवश्यक आहे. मी यापुढे कधीही मॅट्रिक पास होणार नाही. पेपर लिहिणे तर माझ्या हाती आहे.' ताबडतोब माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. त्यानंतर समजावणी, दरडावणी, विनवणी, भांडण, वैताग असे सर्व प्रकार झाले. 'तुला नोकरी करण्यास कधीही सांगणार नाही' अशा प्रतिज्ञा झाल्या. पण कशाचाही उपयोग झाला नाही. ती मॅट्रिक नापासच आहे. माझ्याकडे येणारी अतिशहाणी मंडळी अनेकदा इंग्रजीतून बोलतात. त्यांची समजूत अशी की, तिला इंग्रजी येत नाही. प्रभा मॅट्रिक नाही. पण तिचे इंग्रजी जवळजवळ माझ्याबरोबरीचे आहे. मुद्दा बुद्धी असण्या-नसण्याचा नव्हता. मुद्दा मला नोकरीत पूर्ण गुंतविण्याचा होता. ती पूर्ण यशस्वी झाली. माझा पूर्ण पराभव झाला.
 मला मुली तीन, मुलगा एक, चौघेही जण तिच्या बाजूचे. त्यामुळे सर्व भांडणांत, मतभेदांत आई व मुले मिळून शत्रुपक्षाची मते पाच होतात. आणि मी एकटा. 'तुम्ही लोकशाहीवादी ना, मग आपण प्रश्न मतदानाने सोडवू,' असे आव्हान ती मला नेहमी देते. यामुळे मी नित्य पराभूतच असतो. अल्पमतातील विरोधी पक्षनेत्याकडे खेळ म्हणून ज्याप्रमाणे प्रधानमंत्री पाहतो ती तिच्या वागण्याची पद्धत आहे. इंदिरा गांधी पंतप्रधानपदावरून खाली उतरल्या त्या आठवड्यात जेवताना मी गप्पांच्या ओघात म्हटले, " चला, इंदिरा गांधी खाली उतरल्या, मलाही आता मुक्ततेची आशा निर्माण झाली आहे. मुलांना अशा वेळी हसू येते. " अजून याला मुक्ततेची आशा आहे" हा त्यांना विनोद वाटतो. प्रभा म्हणाली, " हे पहा, मी सत्तेतून खाली उतरेन तेव्हा तुम्हांला आग्रहाने कुणी जेवू घालणार नाही."
 मी प्रथम नोकरीला लागलो तेव्हा माझा पगार दरमहा छपन्न रुपये सात आणे होता. आजच्या मानाने त्या वेळी स्वस्ताई होती. आम्ही राहतही गरिबीनेच होतो. तरीही घरखर्चाला दरमहा ७५ रु. लागत. दीड खोलीचे घर. त्यात मी, माझा एक ब्रह्मचारी मित्र व पत्नी असे तिघेजण राहत होतो. पती-पत्नींना खाजगी बोलण्याची सोयही नव्हती. आणि हळू आवाजात खाजगी बोलण्याची मला सवयही नव्हती. तिलाही अशा खाजगी प्रेमकूजितांची गरज वाटली नाही. 'प्रायव्हसीं' नाही अशी तक्रार तिने कधी केली नाही. " लग्न जाहीर, बाळंतपण जाहीर, आता गुप्त काय राहिले ?" असा तिचा ठाशीव मुद्दा असे. वृथा खर्च नको म्हणून या काळात मी