हे पान प्रमाणित केलेले आहे.

४६ : वाटचाल

दीड महिन्याला न्हाव्याकडे जाई. त्यामुळे दाढी दीड महिन्याला होई, यावर तिची तक्रार नव्हती. फाटकी धोतरे मी घरी नेसे त्यावरही तक्रार नव्हती. विवाहानंतर तिने क्रमाने काही बदल केले. प्रथम म्हणजे माझी हाफ पँट गेली व धोतर आले. दुसरे म्हणजे शेंडी गेली डोक्यावर केस आले. शर्टखाली बनियन प्राध्यापक झाल्यानंतर आले. तिला केस ठेवणे आवडते. मी ठेवतो. मात्र मी याला पराभव समजत नाही. हा भाग तडजोडीचा.
 समोर बसलेल्या विद्यार्थ्याला आकंठ तृप्त होईतो शिकवायचे हा माझा जन्मभराचा आनंद आहे. समोरच्या विद्यार्थ्याने घेताना थकावे इतके मी ओतणार. नोकरीच्या आरंभकाळी संसार चालण्यास पैसे कमी पडत म्हणून मला नाइलाजाने शिकवण्या कराव्या लागत. शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याला 'दर' सांगावा ही गोष्ट मला अतीव यातनेची होती. पण माझा नाइलाज होता. मला शिकवणीचे पैसे बरे मिळत. नोकरीचा पगार ५६ रु. ७ आणे, पण शिकवणीवर दरमहा शंभर रुपये मिळत. मुले पैसे आणुन देत तो माझा शोकदिन असे. मध्येच एखादा विद्यार्थी म्हणे, “ गुरुजी, या महिन्यात माझा हात तंग आहे. पैसे पुढच्या महिन्यात देतो." मग तर मला जेवण सुचायचे नाही. झोप यायची नाही. प्रभावती हे सारे गप्प बसून पाहत होती. तिने कधी या विषयावर चर्चा करून माझी समजूत घातली नाही. नोकरीचे नवे वर्ष उजाडले. आणि माझा पगार ७८ रु. १४ आणे झाला. बाईसाहेब म्हणाल्या, “ हे पहा, आजपासून शिकवणीचे पैसे घेणे बंद. पैसे नको, तुमचे तडफडणे नको.७५ रु. संसाराला पुरेत. दरमहा ३ रु. १४ आणे तुम्ही मोकळे. पणाने चैनीसाठी खर्च करा." त्या दिवसापासून हे घर विद्यार्थ्यांना मोकळे आहे. या, पोटभर शिकून जा. आणि मोफत शिका. मीही यातनामुक्त आहे.
 पैशाचा मोह मला कधीच नव्हता. खूप पैसा मिळवावा असे मला कधीही वाटले नाही. पैसा जतन करावा असेही मला वाटले नाही. बरे, माझा योग असा की, मला पैसा कधी कमीही पडला नाही. प्रभावतीलाही पैशाचा मोह नाही. दागिन्यांची आवड नाही, नटणे नाही. जाहीर तर सोडा, एकांतातही ' मला हे हवे, ते हवे' अशी भाषा नाही. त्यामुळे आम्हा दोघांत पैसा हा कधी भांडणाचा विषय नव्हता. दारिद्र्य हा कधी तिच्यासाठी खंतीचा विषय नव्हता. स्वेच्छेने दारिद्र्य स्वीकारणाऱ्यांच्या वागण्यात जशी दारिद्र्याची मस्ती आणि द्रव्य व द्रव्यवान यांच्याबाबत तुच्छता असते तशी तिची वागणूक आहे. तिची काव्यशून्य सुभाषिते नोंदवितो. " सीता राज्य सोडून रामासह गेली, यात कौतुक करण्याजोगे काय आहे ? हजारो बाया नवन्यासाठी दरिद्री झाल्या, त्या हजारांत एक सीता." " गरजेपुरता पैसा लागतोच. तो मिळवावा. त्यापेक्षा अधिक पैशाची इच्छा असेल तर लग्न करू नये. दुकान मांडावे." " जपलेला पैसा शिळा होतो. शिळ्याचा मोह धरू नये."