हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रभावती कुरुंदकर : ४९

 तिच्या मनाचा एक कोपरा चैनी आणि विलासीसुद्धा आहे. दर एक-दोन वर्षाला एकदा आम्ही एकत्र सिनेमाला जातो. त्या दिवशी तिची सर्व उधळपट्टी चालते. मग खर्चाचा धरबंध नाही. रिक्षाने जाणार. फुलांची वेणी घेणार, सर्वोच्च तिकिटावर बसणार, पान खाणार, असा सगळा थाट. त्या दिवशी तिला अत्तरही चालते. पण हा योग फार दुर्मीळ.
 अजून एक मुद्दा सांगणे आवश्यक आहे. तो म्हणजे आम्ही खूप भांडतो. सामान्यपणे सकाळी व संध्याकाळी अशी दररोज दोन भांडणे होतात. तास दीड तास असे दीर्घ अबोलेही असतात. भांडणात प्रायः बोलण्याचे काम मी करतो. प्रभावतीबाईंवर कशाचाही परिणाम होत नाही. भांडणाचे कारण पैसा नाही. अन्य स्त्री नाही. मग भांडणे का होतात? हा संशोधनाचा विषय आहे. प्रभावती मुद्देसूद व निर्णायक असे बोलते. ती माझे ऐकतही नाही. तिला रागही येत नाही. तिचे चुकले असे तर तिला वाटतच नाही. सगळा आविर्भाव, चूक तुमची पण आम्ही क्षमा करू, असा असतो. भांडणाचा अतिशय उद्धट समारोप ती करते. उदा० "पुरे, आता जेवा.", " आता उठा, हात धुवा.", " आता झोपा.", "उरलेले भांडण उद्या." इ०
 अशा स्त्रीच्या सहवासात गेली सत्तावीस वर्षे मी आहे. आता तिचेही केस पांढरे होऊ लागले आहेत. पण पूर्वी माझे व तिचे केस काळेच होते. दोघेही संसारी होतो. त्या काळातली एक गोष्ट सांगून मी थांबणार आहे. माझे मित्र (कै.) हमीद दलवाई एकदा नांदेडला माझ्या घरी आले. वेळ रात्रीची होती. आणि गप्पा रंगल्या. रात्रीचे बारा वाजले. तेव्हा पत्नीने दोघांच्या समोर चहा ठेवला. दलवाई म्हणाले, " वहिनी, आता उशीर झाला. आता मी निघतोच." चहा पिऊन पुन्हा आम्ही गप्पा मारू लागलो. रात्र संपत आली. पहाटे चारला पत्नीने पुन्हा चहा आणून समोर ठेवला. दलवाई म्हणाले, " वहिनी, काय हा त्रास तुम्हाला! मी म्हणजे काय शुद्धीवर नसतोच मुळी !" प्रभावतीबाई म्हणाल्या, "शुद्धीवर नसणाऱ्यांचेच हे घर आहे. शुद्धीवर असणाऱ्यांना इथे वावच नाही!"
 दलवाई नंतर मला म्हणाले, " गड्या, धार फार तिखट आहे !"