हे पान प्रमाणित केलेले आहे.

संगीताचा नाद : ५३

आलो. रामभाऊ पिंगळीकरांना सर्वच घराण्यांचे चांगले गाणे आवडते. ते घराण्याचे बंधन मानत नाहीत, याचे पूर्वी मला नवल वाटे. गुंजकरांच्या सहवासात आल्यावर नवल संपले. अण्णासाहेब गुंजकर हे पिंगळीकरांचे गुरू. संगीताच्या क्षेत्रात जे जे काही चांगले आहे ते सर्वच आपले आहे ही भूमिका गुंजकराची. मुक्त रसिकता हे अण्णासाहेबांचे वैशिष्टय. तेच गुरूकडून शिष्यांच्याकडे आले होते. रसिकता डोळस असावी, हा गुंजकरांचा नित्य प्रयत्न असे. अण्णासाहेबांनी रसिकांची घडवलेली एक पिढी पाहून मी इ. स. १९५४ ला प्रभावित झालो होतोच. पुढे नांदेडला आल्यानंतर त्यांचा डोळसपणा, मोकळी रसिकता पाहून मी अधिकच प्रभावित झालो आणि गुंजकरांच्या सहवासामुळे सतत संगीतात काहीतरी वाचायला, विचार करायला प्रवृत्त झालो.
 भरत नाट्यशास्त्रातील आणि संगीत-रत्नाकरातील संगीत विचारांचे चिंतन माझ्याकडून घडले, ते मी नांदेडला असल्यामुळे ! मी सतत संगीतातील कोणता तरी विषय घेऊन बोलावे हा गुंजकरांचा आग्रह राहिला. म्हणून एक डोळस रसिक या नात्याने मी या क्षेत्रात आहे. गुंजकरांच्या शिष्यांच्या नादी लागून मी संगीतात आलो, गुंजकरांच्या नादी लागन मी या क्षेत्री टिकलो इतकाच याचा अर्थ. एरव्ही ज्यांना उपजत संगीताची आवड असते त्या गटाचा मी सभासद नव्हतो.बा...४