हे पान प्रमाणित केलेले आहे.

पूर्वपक्ष-उत्तरपक्ष : ६७

प्रकारे हवा होता. त्याचे म्हणणे असे की, पूर्वपक्ष म्हणून एक तास कुणीतरी आगरकरांच्या विरोधी बोलावे. मग उत्तरपक्ष म्हणून मी खंडनपूर्वक आगरकरांची बाजू मांडीन. हा असा कार्यक्रम रचणे फार कठीण होते. कारण पूर्वपक्ष मांडण्यासाठी कोणीतरी सनातन धर्माभिमानी पकडणे भाग होते. सनातनी माणूस म्हणणार, " तुम्ही धर्मशास्त्र प्रमाण मानून चर्चा करणार असाल तरच मी येतो. शिवाय तुमच्या आक्षेपांना उत्तरे देण्याची संधी मला मिळावी." ह्यातून फक्त भांडणे, कदाचित मारामारी, निदान शत्रुत्व नक्की निर्माण होणार हे माझ्या व्यवहारी बुद्धीला दिसत होते. पण माझ्या मित्राला तर असा कार्यक्रम हवा होता. त्यांना उत्तरपक्ष करण्याचे भले मोठे टेंगुळ उठले होते.
 शेवटी कार्यक्रम ठरला. पूर्वपक्ष मी करावयाचे ठरविले. आगरकरांच्या विरोधी व सनातन धर्माच्या बाजूने मी काय बोलतो हे ऐकण्याची उत्सुकता होती म्हणा, थोडीफार वक्ता म्हणून माझ्या नावाला किंमत आहे असे म्हणा, किंवा उलट बाजूने माझे मित्र सगळ्यांना सांगत होते, " मी कुरुंदकरांची कशी उडवतो ते पाहण्यास या " ह्या प्रचारामुळे म्हणा, सभागृह गच्च भरलेले होते. परिचय, पुष्पहार आदींच्या नंतर मी पूर्वपक्ष मांडला. माझा पूर्वपक्ष माझ्या आगरकराभिमानी मित्राला इतका अनपेक्षित होता की काय बोलावे हे त्यांना सुचेना. त्यांनी उत्तरपक्ष केलाच नाही. फक्त मला शिव्या दिल्या. लोक हसत होते. मीही शिव्या हसत ऐकत होतो. रागारागाने हे मित्र सभास्थान सोडून गेले व येथून जी माझी-त्यांची मैत्री त्यांच्या बाजूने तुटली ती अनेकदा प्रयत्न करूनही अजून जुळलेली नाही. भांडणे नको, गावात तट पडणे नको, म्हणून मित्रप्रेमाने मी कार्यक्रम घेतला. पूर्वपक्ष मी केला, पण पदरात फळ काय पडले तर 'मैत्रीचा वध.'
 "माझ्याविरुद्ध कुणीतरी बोला, म्हणजे मी ठोकून काढतो. मात्र विरुद्ध बोलताना मला अपेक्षित आहेत तेवढे मुद्दे बोला. मला अनपेक्षित बोलाल तर मैत्री संपली," हा पवित्रा तेव्हाही मला बालिश वाटला. आजही बालिशच वाटतो. पण सहज गंमत म्हणून जो आगरकरविरोधी पूर्वपक्ष त्या वेळी मी मांडला तो आजही मला बालिश वाटत नाही. आजही मी त्या पूर्वपक्षाच्या प्रामाणिक उत्तरपक्षाची वाट पाहत आहे. माझा पूर्वपक्ष असा होता : " कोणत्याही समाजव्यवस्थेत काही गुण असतात. काही दोष असतात. बालविवाहाचा गुण हा की, हुंडयाचे प्रश्न फार बिकट नव्हते. देखणेपणाचे व कातडीच्या सौंदर्याचे स्तोम नव्हते. संसाराला स्थिरता खूपच होती. दोष हा, की त्यातून स्त्रियांची गुलामी व विधवांच्या संततीचे प्रश्न निर्माण होत प्रौढ विवाहामुळे स्त्रियांची गुलामगिरी संपेल ही खात्री नाही. हुंडयाचे प्रस्थ वाढत राहते. कातडीच्या सौंदर्याला भाव येतो व कुमारीमातांचे प्रश्न निर्माण होतात. विधवेने अनैतिक वागणे, त्यातून विधवांच्या संततीचा प्रश्न