या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीसरस्वतीमंदिर. वर ऐतिहासिक दृष्ट्या किती भरंवसा ठेवावा, हा मुद्दा बराच नाजूक व वादग्रस्त *आहे. कित्येकांस आपल्या अतिभूमीला गेलेल्या प्रेमाच्या, पूज्यभावाच्या व विश्वासाच्या जोरावर हे सर्व अद्भत प्रकार सर्वथैव खरे मानण्याला कोणतीच दिक्कत वाटत नाही, व दुसरे या गोष्टींना तर्कशास्त्राच्या कसोटीला लावून, त्यांत सत्याचा लवलेशही नाही म्हणून त्यास नादान व टाकाऊ ठरविण्यास मुळीच डगमगत नाहीत. परंतु इतर बऱ्याच वादांप्रमाणे प्रस्तुत प्रकरणीही निर्भेळ सत्य कोठे तरी मध्यंतरी असून, त्यास दोन्ही पक्ष अंशतः पारखे झालेले आढळतात; कारण या अद्भत चमत्कारांना सारासार विचाराची चाळण लाविली म्हणजे अखेर थोडेंसें तरी सत्य हाती आल्यावांचून राहात नाही. पण हा घोंटाळू पहाणारा मुद्दा जरी एकवार बाजूस ठेविला व अशा प्रकारच्या संतांच्या व साधूंच्या चरित्रांतून असंभवनीय भाग गाळला, तरीसुद्धां चरित्रनायकांच्या आयुष्यातील बऱ्याच ठोकळ गोष्टी समजून येतात. मिहीपतिबोवा ताहाबादकर यांनी अठराव्या शतकांत अशा त-हेची निरनिराळ्या शेंकडों संतांची चरित्रे संकलित करून, संतविजय, भक्तविजय, संतलीलामृत व भक्तलीलामृत हे ओवीबद्ध ग्रंथ लिहिले. यांत ज्ञानेश्वरांपासून झाडून लहान मोठ्या साधुभक्तांची चरित्रे असल्यामुळे, कविचरित्रं लिहितांना अर्वाचीन चरित्रकारांना त्यांचा अवर्णनीय उपयोग झाला आहे.

  • रा०रा० विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांनी हनुमंतस्वामीच्या रामदासी बरखरीसंबंधे जे उडार काढिले आहेत, ते अशा त-हेच्या संतचरित्रांना सामान्यतः लागू करण्याला हरकत नाही. ते म्हणतातः-समर्थीनी अद्भुत चमत्कार केल्याचे हनुमंतस्वामीने लिहिले आहे. परंतु तो सर्व हनुमंतस्वामीच्या कल्पनेचा खेळ होय. समर्थांचे अद्भुत चमत्कार सांगण्यांत हनुमंतस्वामीने आपल्या स्वतःच्या भोळेपणाचें मात्र हास्यकारक प्रदर्शन केले आहे.........समर्थाच्या वेळची मंडळी धर्मनिष्ठ होती व हनुमंतस्वामीच्या वेळची मंडळी धर्मभोळी होती.

-रामदास. - महीपति इ० स० १७१५-१७९०. हे मोरोपंताचे समकालीन होते. यांनी आपली संतचरित्रं, नाभाजीचे 'संतचरित्र' व उद्धवचिद्वनाचे 'भक्तचरित्र' या ग्रंथांच्या व वृद्धांच्या तोंडून वगैरे स्वतः मिळविलेल्या माहितीच्या आधारें लिहिली आहेत, असें भक्तविजयाच्या आरंभी स्पष्ट सांगितले आहे.