पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
तरल संवेदनक्षम मनावर उमटलेले आल्हादकारक दवबिंदू




 प्रा. शैला लोहिया यांच्या वीस लेखांचा 'वाहत्या वाऱ्यासंगे' हा संग्रह. हे लेख निसर्गवर्णनात्मक, व्यक्तिचित्रणात्मक आणि आत्मपर स्मरणरंजनात्मक असले तरी त्यांचा बाज प्रामुख्याने ललित लेखनाचा आहे. निसर्गाच्या विविध रूपांमध्ये हरवून जाणाऱ्या, तरल संवेदनाशील मनाच्या कमलपत्रावर उमटलेले, ऋतुचक्रातील बदलत्या विभ्रमांचे, डोंगरदऱ्यांचे, पानाफुलांचे, ऊनपावसाचे आल्हादकारक दवबिंदू म्हणजे हे भावकोमल लेख. पाचही इंद्रियांच्या सजग साक्षात्कारी चेतनेतून अवघ्या आसमंताला लडिवाळपणे कवेत घेण्याची किमया येथे सहजपणे साधलेली आहे. घटापटाचा आटापिटा येथे नाही. आहे तो अगदी मोकळ्या मनाने जे दिसेल त्याला सामोरे जाण्याचा स्वच्छंद स्वागतशील भाव. श्रावण, भाद्रपद, वसंत ऋतू, आषाढघन यांच्या रंगरूपांचा मनसोक्त वेध घेताना जशी शैलाताईंची काव्यात्म शब्दकळा अनावर आवेगाने उसळून येते त्याचप्रमाणे घरातल्या देशभक्तीच्या आणि राष्ट्रसेवादलाच्या वातावरणामुळे संस्कारित झालेल्या व्यापक सामाजिक जाणीवेच्या आणि माणुसकीच्या लोलकातून पाहताना समाजात रुजलेल्या विषमतेच्या, अन्यायाच्या, रूढींच्या, अंधश्रद्धांच्या पारंपरिक जोखडाखाली घुसमटलेल्या महिलांच्या कहाण्याही त्यांना अस्वस्थ, बेचैन करून टाकतात. स्वत:च्या स्त्रीत्वाचे व सामर्थ्याचे एक उपजत भान त्यांच्यात आहे आणि सद्य:कालीन स्त्रीमुक्तिवादाच्या विविध संकल्पनांद्वारे एक सैद्धांतिक व चिंतनशील बैठक त्याला लाभली आहे, त्यामुळे या लेखांचे स्वरूप तिपेडी झालेले आहे. पस्तीसेक वर्षांच्या कालावधीत लिहिले गेलेले हे लेख; पण याच तिपेडी अंत:सूत्रांमुळे ते सर्व एकमेकांशी घट्ट बांधले गेले आहेत. एका विदग्ध, तरल सामाजिक जाणीवेने संपृक्त अशा व्यक्तिमत्त्वाच्या परीसस्पर्शाने अभिमंत्रित झालेल्या शब्दकळेचा आणि भावसमृद्धीचा हा आविष्कार वाचकाशी सहजपणे सूर जुळवतो. संवाद साधतो.
 प्रा. शैला द्वारकादास लोहिया या पूर्वाश्रमीच्या शैला परांजपे. धुळे येथील समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते ॲड. शंकरराव परांजपे आणि सौ. शकुंतला परांजपे यांच्या कन्या. लहानपणापासून घरात राष्ट्रसेवादलाचे संस्कार. राष्ट्रसेवादल कलापथकाचे कार्यक्रमही त्या काळात जोरात चालत. त्या