पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/८७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सोनकणीस


 गावापासून दूरदूरवर महादेवाचे भलेमोठे तळे आहे. ऐन उन्हाळ्यातही त्यात पाण्याचे सुख उदंड साठलेले असते . निळ्याशार आकाशाचे लोभस रुपडे डोळ्यात साठविणारे संथ पाणी पहायला मी नेहमीच उत्सुक असते. शिशिरातल्या झांझरदवात न्हालेला , पहाटेच्या धुक्यात लपलेला ओला काठ पापणीत साठवून घ्यायला आवडते ते ऐन आश्विन कार्तिकातं. तळ्यातल्या संथ पाण्यावर तरंग वलये उमटत असावीत, वेल वृक्षाच्या घनदाट सावलीत ,बुंध्याला टेकून वसावे नि डोळे मिटून घ्यावेत. त्या गंधखुळ्या हवेत आपणही स्वप्नगंधा होऊन विरून जावे!
 तळ्याला लगटून केवड्याचे प्रचंड वन आहे . काट्यांनी भरलेल्या या कुरूप काटेरी रानाकडे एरवी कुणाचे फारसे लक्षही जात नाही , मोट्यामोठ्या फडेदार नागासारखी लांबचलांब हिरवी पिवळी काटेरी पाने पहिली की उरात अनामिक भयाची वीज मात्र थरकून जाते. पाय आपोआप चार पावले दुरून चालतात .सुस्तावलेल्या प्रचंड अजगरासारखे हे बन आठ महिने नुस्ते पडून असते. पायतळी सुकलेल्या पानांचा ढीग, अंगावर कोळीष्टकांची जाळी . काटेरी पानांचे वेढे असे हे शुष्क वन पाहिले की गोष्टीतली जख्ख म्हातारी चेटकीण आठवते.
 पण, एक दिवस जादूचा असतो . दक्षिणेच्या दारातून बलदंड मेघांचे सावळे थवे सुसाटत येतात. गरजून बरसून जातात. मृगाच्या स्पर्शांनी या काटेरी वनाला जाग येते . वोचऱ्या काट्यांतून तरल चैतन्याचे पाट याहू लागतात. त्या उन्मादाच्या भरात , गंधवती धरेच्या कणाकणातला सुगंधरस पिऊन केवडा वेहोष होतो. सरता ज्येष्ठ आणि आषाढाच्या ऐनातले ओढाळ पाणी पिऊन सुखावलेल्या पानांच्या मधोमध अपार गंधाची कळी आकारू लागते. पिवळ्याधमक सोनसळी रंगाचे झगमगीत सोनकणीस डोकावू लागते. त्या गर्भरेशमी दडस पानांच्या सात पदरी पडद्यांमधून फुटणाऱ्या गंधलाटा कणाकणांतून लहरू लागतात .
 केवडा म्हटला की घनदाट गंधाची लहर सुरेख पिवळ्या रंगाची, टफेटा कापडाच्या पोताची तरतरीत पाने . आणि पानांच्या दुहेरी कडांनी डोकावणारे तीक्ष्ण काटे आठवतात . शहरातून केवड्याच्या गच्च पाणकणसाची मजा क्वचितच अनुभवायला

॥ ८२ ॥ वाहत्या वाऱ्यासंगे ....