पान:विचार सौंदर्य.pdf/१३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

११ 

अलीकडे महाकाव्यें कां निर्माण होतात नाहीत ?



आवाज वगैरे गोष्टींच्या साहचर्यामुळे वर्डस्वर्थ कवचा स्वभाव सरळ, साधा, गंभीर, न डगमगणारा, प्रसंगाला निमुटपणें तोंड देणाय विमा नीरस किंवा विनोदशून्य झाला असें म्हणावयास जागा आहे. परंतु याच किंवा तशाच धबधब्यांच्या, विजांच्या, वावटळींच्या, झंझावातांच्या संगती- मुळे शेले, बायरन यांच्या वृत्ति उद्दाम, बेधडक मुसंडी मारणाऱ्या झाल्या असाव्या. [ काव्य आणि काव्योदय, पृष्ठ २०]

 वरील अवतरणांतील हेत्वाभास दाखविण्याकरितां एक कल्पित गोष्ट सांगणें सोईचें आहे. कांहीं मंडळी एका बागेत गेली असतां त्यांना एक गुलाबाचें झाड दिसले. त्यांतील एकानें गुलाबाचें एक मोठे फूल तोडून हुंगले; दुसऱ्यानें एक अर्धविकसित फूल तोडून बटनहोलमध्ये घातलें; तिसऱ्याने पाकळ्या तोडून टाकण्यास आरंभ केला; चवथ्यानें “ या गुलाबाचें फ्रेंच नांव कायसेंसें आहे तें काय बरें ? " असें म्हटलें व डोके खाजविण्यास आरंभ केला; पांचव्यानें आमच्याकडे या फ्रेंच जातीचा गुलाब नाहीं, पण दुसऱ्या जातीचा आहे असे म्हटलें; सहाव्यानें आपल्या मुलींकरितां कांहीं फुलें तोडलीं; सातव्यानें आपल्या सहचरीला एक फूल तोडून दिलें व आठव्यानें गुलकंदाकरितां कांहीं फुलें तोडून हातरुमालांत घातलीं ! नववा मागें मागें रेंगाळत होता त्याचें कारण असें कीं, त्याला आपल्या गत प्रियतमेच्या गुलाबी गालांची व हास्याची आठवण होऊन तो उदास झाला होता; आणि दहावा गालांतल्या गालांत हंसत तेथेंच उभा होता, कारण त्याला गडक-यांच्या 'गुलाबी कोडया ' ची आणि केशवकुमार अत्र्यांच्या ' प्रेमाच्या गुलकंदा ' ची त्याच वेळीं आठवण झाली ? आतां प्रस्तुत गुलाबाचें झाडच तेथे नसतें तर गुलाबाच्या संबंधीं या भिन्न वृत्ति वहीं भिन्न कर्मे शक्यच नव्हतीं; तेव्हां 'गुलाबाचें झाड' ही परिस्थिति या सर्व कार्याचे कारण आहे आणि यावर कोणी जर आक्षेप घेऊं लागला कीं एकच कारण भिन्न कार्ये कर्शी घडवून आणतें, तर प्रो. पटवर्धनांप्रमाणें ' स्वभावभेदामुळे ' हें उत्तर सांगून मोकळे व्हावें ! उपरिनिर्दिष्ट दहाहि कार्ये गुलाबाच्या झाडाच्या अभावीं अशक्य होतीं, तेव्हां या अर्थानें तें झाड ' कारण ' या संज्ञेस पात्र असले, तरी या झाडामुळे हीं कार्ये घडली या म्हणण्यापासून कांहीं तरी बोध होतो का ? प्रो. पटवर्धनांनीं रुक्ष प्रदेश, नीरस भूरचना, वगैरेंना वर्डस्वर्थ कवीच्या व शेलेच्या स्वभावाचें