पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१०२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(९६)

अवस्था या भिन्न आहेत हे म्हणण्यास आधार काय ? तसा आधार कांहीच नाही. त्यामुळे मला यातना होत असल्या तर अफू घेऊन 'मी' ही जाणीव नष्ट करून. त्या थांबविणे याने जे सुख होते, त्याच जातीचे सुख म्हणजे अभावरूप सुख हेच मोक्षाने मिळते. इतकेच फार तर म्हणता येईल. पण हे सुख अगदीच हीन दर्जाचे आहे असे आपण आरंभीच पाहिले आहे.
 मोक्षासंबंधी दुसरा एक गैरसमज करून देण्याची चाल आहे. मोक्ष हे सुख नुसते दीर्घकाल टिकणार आहे एवढेच नव्हे तर ते अत्यंत उत्कट, अगदी अलौकिक आपल्याला कल्पनाही येणार नाही इतके अलौकिक आहे, इतर सुखे त्याच्या पुढे पासंगालाही पुरणार नाहीत असे वर्णन धार्मिक ग्रंथांतून केलेले असते. पण मोक्षसुखाची कल्पना प्रथम ज्यांनी सांगितली त्या उपनिषदांत या सुखाचे जे वर्णन आहे, त्यावरून या सर्व कल्पना फोल आहेत असे दिसून येईल. छांदोग्य उपनिषदाच्या मते गाढ निद्रेचे सुख व मोक्षसुख यांत काहीच फरक नाही. गाढ निद्रेत जीव हा निजस्वरूपात विलीन होत असतो 'सता सौम्य तदा संपन्नो भवति' असे गाढ झोपेचे वर्णन केलेले आहे. (छां. ६-८-१ म्हणजे हे मोक्षसुख प्रत्येक मनुष्य निदान कष्टाळू मनुष्य तरी रोज पाच सहा तास अनुभवीत असतो असे उपनिषदाचे मत आहे शंकराचार्य व विद्यारण्य यांनीही हे मत मान्य केले आहे. वरील भागावरील आचार्यांचे भाष्य असे आहे. 'मनसि प्रविष्टं मन आदि संसगंकृतं जीवरूपं परित्यज्य, स्वं सद्रूपं यत् परमार्थसत्यमपोतोऽपिगतो भवति' पंचदशीमध्ये विद्यारण्यानी तर याहीपेक्षा स्पष्ट वर्णन केले आहे.

तच्छ्रमस्यापतुत्त्यर्थं जीवो धावेत् परात्मनि ।
तेनैक्य प्राप्य तत्रत्यो ब्रह्मानंद: स्वयं भवेत् ।। ११-४५

 पंचदशीच्या पुढच्या दोन तीन श्लोकांत व त्याचप्रमाणे बृहदारण्यकोपनिषदातही वाटेल ते शब्द खर्चून, अतिशयोक्ती होईल इतके या सुखाचे वर्णन केले आहे. आता या आचार्यांच्या व श्रुतीतील वचनान्वये मोक्ष व गाढ निद्रा यांच्या सुखात जर काडीमात्रही फरक नसेल तर मोक्षाची जी भरमसाट वर्णने आपण वाचतो, ती सर्व आलंकारिक आहेत, असे म्हणण्यावाचून गत्यंतरच नाही. उपनिषदांतही मोक्षासुखाची विलक्षण वर्णने सापडतात. पण झोपेच्या सुखाचीही तसलीच वर्णने आहेत आणि ते काही असले तरी गाढ