पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१०३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(९७)

झोपेचे सुख व मोक्ष यात फक्त ऱ्हस्वदीर्घत्वाचाच जर फरक असेल तर त्या आलंकारिक बेफाम वर्णनाचा काही एक उपयोग नाही. आणि मग मोक्षसुखाची ज्याला गोडी लागली त्याला इतर सुखं तुच्छ वाटू लागतात, त्या सुखांवरून इतर सुखे ओवाळून टाकावीशी वाटतात. या म्हणण्यात काहीच अर्थ उरत नाही. कारण प्रत्येकाला हे सुख रोज अनुभवावयास मिळत असूनही त्याला इतर सुखे हवीशी वाटतातच. इतकेच नव्हे तर हे परम सुख टाकून देऊन कित्येक मानव नाचरंगांत तो काळ घालवितात. कित्येक पंडितही हे सुख सोडून वाचनमननात रात्रीच्या रात्री घालवतात. त्यांवरून हे सुख अडाण्यांना तर नाहीच पण पंडितानाही मोठेसे लोभनीय वाटते असे नाही. यावरून मग असा विचार डोकावतो की व्यभिचार, नाचरंग, दारू यांसारखी वाटेल ती कृत्ये करूनही मनुष्य जर बेफिकीर राहील व खूप शारीरिक कष्ट करील तर त्याला रोज ब्रह्मसुख मिळण्यास मुळीच पंचाईत पडणार नाही आणि त्यालाही हे सुख मिळणार असेल तर मोक्षासाठी तपश्चर्या करण्याचे कारणच नाही. वार्धक्य आले की काही तरी युक्ती करून झोपेतच प्राण जाण्याची व्यवस्था केली म्हणजे झाले. किंबहुना रोजच्या या महापुण्याच्या संचयामुळे आपोआपच तसे घडून यावयास हरकत नाही.
 आध्यात्मिक सुख हे अशा तऱ्हेने अगदी भ्रामक, हीन दर्जाचे व अलोभनीय ठरल्यानंतर आपल्यापुढे दोन प्रकारचीच सुखे राहिली. शारीरिक व मानसिक. त्यातले मानसिक सुख हे दीर्घकाल अनुभवती येणे शक्य असल्यामुळे शारीरिक सुखापेक्षा श्रेष्ठ आहे असे आपण पाहिले. येथे एक गोष्ट पुनः पुन्हा नजरेस आणावीशी वाटते की शारीरिकांपेक्षा मानसिक व मानसिकांपेक्षा आध्यात्मिक सुख श्रेष्ठ ही जी प्रतवारी लाविली जाते तिच्या बुडाशी कालाच्या अल्पदीर्घत्वावाचून दुसरे कांहीही नाही. म्हणजे सुखासुखांत कमीअधिक तीव्रता नसते असा याचा अर्थ नाही. एक शारीरिक सुख दुसऱ्या शारीरिक सुखापेक्षा श्रेष्ठ असू शकते. व तेच मानसिक सुखाच्या बाबतीतही असू शकेल. पण उत्कट शारीरिक सुखापेक्षा उत्कट मानसिक सुख तीव्रतेच्या, लज्जतीच्या दृष्टीने श्रेष्ठ असते असे म्हणता येणार नाही. एक टाकून दुसरे घ्यावयाचे ते केवळ दीर्घकाल टिकते एवढयाचसाठी. श्रीखंड खाणे, सुंदर युवतीचा नाच पाहाणे किंवा मद्य पिऊन बेहोष होणे ही सुखे वाटेल तितका