पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१०४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(९८)

दीर्घकाल अनुभवणे जर शक्य असते, शरीराला व्याधी जडून त्यांना जर मर्यादा पडल्या नसत्या, तर धर्माने त्यांचा निषेध केव्हाच केला नसता. कारण दीर्घकाल सुख मिळवून देणे एवढेच धर्माचे साध्य आहे. मोक्षसुख, गाढ निद्रेचे सुख व स्त्रीसंगाचे सुख यांची तीव्रता उपनिषद्कारांच्या मते एकच आहे. प्रिय स्त्रीशी संपरिष्वक्त झाल्यावर पुरुषाला बाह्यांतर भान जसे राहात नाही. त्याचप्रमाणे- एवमेव अयं पुरुषः प्राज्ञेन आत्मना संपरिष्वक्तो न बाह्य किंचन वेदनान्तरम्- त्या स्थितीतही बाह्यांतर भान नसते असे बृहदारण्यकोपनिषदात म्हटले आहे. (१४।३।२१). पण तीव्रता तीच असली तरी शारीरिक सुख फार मर्यादित आहे, म्हणून धर्मशास्त्र त्याचा निषेध करते.
 व्यक्तीच्या दृष्टीने विचार केला तर सुख हेच मानवाचे ध्येय आहे आणि शारीरिक सुखापेक्षा मानसिक सुख श्रेष्ठ असल्यामुळे ते प्राप्त करून घेण्यासाठी त्याने झटणे हे युक्त आहे असे आपण पाहिले. आता समाजाच्या दृष्टीने विचार करून त्या दृष्टीनेही हेच ध्येय ठरते की काय व ठरत असल्यास तेथे सुखाची श्रेष्ठकनिष्ठता कशावरून उरते ते आपणास पहावयांचे आहे.
 सुख हे व्यक्तीचे ध्येय म्हणून एकदा मान्य केल्यानंतर समाजाचेही ध्येय तेच असले पाहिजे हे अमान्य करता येणार नाही. कारण अनेक व्यक्ती एकत्र येणे याचेच नाव समाज व्यक्ती काढून टाकल्या तर समाज म्हणून स्वतंत्र काहीच उरत नाही. सर्व व्यक्तींना दुःख होत असताना समाजाला मात्र सुख होईल किंवा दुःख होणार नाही, हे शक्य नाही. म्हणून व्यक्तींना सुख मिळवून देणे हेच समाजाचे ध्येय असावयास पाहिजे मात्र एका व्यक्तीचे सुख हे समाजाचे ध्येय न राहाता सर्व व्यक्तींचे सुख, व ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त व्यक्तींचे सुख हे समाजाचे ध्येय राहील मानवप्राणी हा इतका दुर्बल आहे की समाजाशिवाय म्हणजे अनेक व्यक्ती एकत्र राहिल्याशिवाय त्यांचे जीवनच अशक्य आहे. म्हणून समाज टिकवून धरणे हे समाजातील व्यक्तीचे सर्वात श्रेष्ठ कर्तव्य होय. दुसरे कोणचेही सुख समाजाकडून व्यक्तीला मिळाले नाही, तरी प्राणरक्षणाचे सुख मिळालेच पाहिजे. कारण त्यासाठीच त्याचे अस्तित्व आहे. तेव्हा जास्तीत जास्त व्यक्तीना