पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१०५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(९९)

जास्तीत जास्त सुख देणे हे ध्येय, समाज संघटित राखणे हे पुण्य व तो फुटून जाईल असे कोणचेही कृत्य करणे हे पाप, या तीन गोष्टी मनात बाळगल्या तर कोणत्याही श्रेष्ठ-कनिष्ठतेच्या किंवा नीती-अनीतीच्या प्रश्नांचा सहज उलगडा होईल.
 पण हा उलगडा कसा होतो हे पाहण्याच्या आधी जास्तीत जास्त व्यक्तींचे सुख हे जे आपण समाजाचे ध्येय ठरविले त्यावर जे अनेक आक्षेप घेतले जातात त्यांचा विचार करणे अवश्य आहे. या ध्येयावर पहिला आक्षेप असा. की संख्येवर जर आपण नीती अनीती ठरवू लागलो तर मोठा गोंधळ उडून जाईल. समजा दहा माणसांनी कट करून एका निरपराधी माणसाला मारले, तर बहुसंख्यांचे सुख या तत्त्वाअन्वये आपणांस त्या दहा लोकांना शिक्षा करता येणार नाही. कारण शिक्षा केली तर दहांना दुःख होईल व नाही केली तर एकाचेच नुकसान होईल. पण हा आक्षेप बरोबर नाही. कारण समाज त्या दहा व्यक्तींना जेव्हा शिक्षा करतो, तेव्हा त्याची विचारसरणी पुढीलप्रमाणे असते. या दहांना जर शिक्षा केली नाही तर खून करण्यात काही वाईट नाही असा इतरांचा समज होईल. कोणीही मनुष्य एकट्याच्या फायद्यासाठी दुसऱ्याचा खन करील. यावरून यांना जर शिक्षा केली नाही, तर अनेकांचे जीवित धोक्यांत येईल हे स्पष्ट आहे. म्हणजे येथे दहांचे सुख विरुद्ध एकाचे सुख असा प्रश्न नसून दहांचे सुख व सर्व समाजाचे सुख असा हा प्रश्न आहे. आणि म्हणूनच त्या दहांना शिक्षा करणे युक्त आहे. न्याय, सत्य, ही जी समाजधारणेची तत्त्वे आहेत त्या कोणच्याही तत्त्वासाठी समाज वाटेल तितक्या माणसांचे बळी घेण्यास मागेपुढे पहात नाही, याचे कारण हेच आहे. तत्वे काही उगीच अस्तित्वांत येत नाहीत. सर्व व्यक्तींच्या रक्षणासाठी म्हणजे समाजधारणेसाठी अमुक एक प्रकारचे अचारण युक्त आहे, असे अनुभवाअंती ठरल्यानंतर त्या अनुभवावरून सिद्धान्त काढून समाज त्याला अढळ असे तत्त्वरूप देऊन टाकतो. मग ते तत्त्व पाळणारा एक मनुष्य व मोडणारी हजार माणसे असली तरी समाज एकाचीच बाजू घेईल व हजारांना शिक्षा करील व जरूर तर ठारही मारील. कारण ते अमूर्त तत्त्व याचा अर्थ लाखो जणांचे किंबहुना सर्व समाजाचे सुख असा आहे. आता पुष्कळ वेळा त्या तत्वांतील तत्त्वपणा म्हणजे अनेकांना सुख देण्याचे सामर्थ्य नाहीसे झालेले असते