पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१०६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१००)

तरी पण समाज ते आंधळेपणाने तसेच मानीत असतो. व त्याच्या भंगासाठी लोकांना शिक्षा करीत असतो. पण मानवी ज्ञानाला मर्यादा असल्यामुळे हे व्हावयाचेच. मोठ्या समाजसुधारकाची जरूर असते ती याच वेळी. तत्व ही समाजाची मोठी शक्ती आहे. ती आपणावरच उलटली आहे हे अगोदर पुष्कळांच्या ध्यानांत येत नाही. कारण समाजरचनेचा अभ्यास प्रत्येक जण करीत नसतो. काहींच्या ते ध्यानात येते. पण हे कुजलेले तत्त्व उलथून टाकण्याचे सामर्थ्य त्यांना नसते. ते सामर्थ्य क्वचित् एकाद्या महापुरुषाच्या अगी असते. तो त्यावेळी समाजाचा नेता बनतो, व नवीन तत्त्वे सांगून समाजाची घडी बसवून देतो. पण कोणचेही तत्त्व पाहिले तरी त्याच्या बुडाशी अनेकांचे सुख ही एकच गोष्ट आपणास दिसून येते. त्यामुळे लाखो दुर्जन व एक सज्जन यांत संख्याधिक्यावरून लाखो दुर्जनांचे हित केले पाहिजे ही आपत्ती येत नाही. म्हणजे यावरून जास्तीत जास्त लोकांचे सुख या ध्येयाअन्वयेही दहांना शिक्षा करणे युक्त असाच निकाल होतो.
 हे ध्येय मान्य केले तर त्या समाजात कर्त्याच्या सदअसद्बुद्धीचा विचार होत नाही, केवळ परिणामावरूनच निर्णय द्यावा लागतो, असा आणखी एक आक्षेप घेण्यात येतो. सार्वजनिक काम करणारे लोक पुष्कळ वेळा पैसे खातात. समजा पन्नास लाख रुपये जमवून एकाद्याने महाराष्ट्र विद्यापीठ स्थापले. पण तसे करताना दोन तीन रुपये खाल्ले तर यावर आक्षेपकांचे म्हणणे असे की विद्यापीठामुळे पुष्कळांना पुष्कळ सुख झाले आहे, तेव्हा तसे करताना त्या संस्थापकाने पैसे खाल्ले तर तुम्हांला त्याला शिक्षा करता येणार नाही. पण मला वाटते असे म्हणण्याचे काहीच कारण नाही. तत्त्व म्हणजे बहुसंख्याकांचे सुख हे जर ध्यानांत ठेवले, तर हा प्रश्न उद्वणारच नाही. परक्या धनाचा अन्यायाने अपहार करणे हे वाईट आहे. कारण त्यामुळे समाजाच्या अस्तित्वावरच गदा येते असे समाजाने एकदा ठरविले आहे. त्यामुळे विद्यापीठ स्थापले व सर्व महाराष्ट्रीयांचे कल्याण साधले हे जरी खरे असले तरी तसे करतानाही पैसे खाऊ नये या दुसऱ्या कल्याणकारक तत्त्वावर जर त्याने घाला घातला तर ते निंद्यच होय. कारण तत्त्वावर घाला म्हणजे समाजाच्या सुखावर घाला हे समीकरण ठरून गेले आहे. आता फार मोठे कार्य केल्यामुळे समाज कदाचित् तो गुन्हा क्षम्य मानील, हे निराळे. पण तो गुन्हा