पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१०७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१०१)

आहे यात शंकाच नाही. म्हणजे पुष्कळांचे पुष्कळ सुख या ध्ययाअन्वयेही कर्त्याच्या बुद्धीला महत्त्व द्यावेच लागते. कारण तो आपले कार्य करताना समाजाच्या मूलतत्त्वांना म्हणजेच बहुतांच्या सुखाला मान देतो की नाही हे पाहावे लागते. दहा हजार शिलकेपैकी पांचशे रुपये देणारा व शंभरापैकी शंभर रुपये देणारा यांत बहुतांचे सुख या ध्येयाप्रमाणे दुसराच श्रेष्ठ ठरेल. कारण इतरांना मदत करण्याची प्रवृत्ती हे तर समाजाचे जीवन होय. त्यामुळे समाज जास्त सुसंघटित होतो तेव्हा ती प्रवृत्ती ज्याने जास्त दाखविली तो श्रेष्ठ व ज्याने कमी दाखविली तो कनिष्ठ. आता दहा हजार मिळवून पांचशे देणे यांत एवढे पैसे मिळविणे हे एक प्रकारचे सामर्थ्य आहेच व त्यासाठी त्या गृहस्थाला मान मिळेल यात शंकाच नाही. पण समाजाला दुसऱ्या प्रकारची प्रवृत्ती जास्त उपयुक्त आहे. कारण प्रत्यक्ष पाचशे रुपयांनी जे सुख होणार त्यापेक्षा त्या प्रवृत्तीने अंती जास्त होणार आहे. म्हणून समाज तिला जास्त मान देतो
 या पंथावर आणखी एक फारच मोठा आक्षेप येतो तो असा की यांत 'मी दुसऱ्याच्या हितासाठी का झटावे ?' या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळत नाही व्यक्तीचे सुख हेच ध्येय असेल तर प्रसंगी समाजाचे नुकसान करूनही मी आपले हित का साधू नये असा जर कोणी प्रश्न विचारील तर त्याला उत्तर देण्यास पंचाईत येईल असे कोणी म्हणतात, पण ही अडचण खरी नाही. जगण्याची इच्छा प्रत्येकाला आहे व समाजावाचून जगणे अशक्य आहे म्हणून समाजधारणेसाठी झटण्यांत आपण पर्यायाने आपल्याच हितासाठी झटत असतो, हे जर प्रत्येकाच्या ध्यानात आणून दिले तर सुबुद्ध माणसाला दुसरे उत्तर नको आहे. आता प्रत्येकाला हे कळणे शक्य नाही. इतरांचे सुख कशात आहे हे नेहमी ठरविणे कठिण असते आणि थोड्या लोकांना कळले तरी बहुसंख्यांना कळणार नाही इत्यादि जो आक्षेप आहेत ते धार्मिक तत्त्वावर उभारलेल्या समाजाला जसेच्या तसे लागू करता येतील. म्हणजे कोणचेही तत्त्व घेतले तरी या अडचणी कधीच सुटत नसतात. पण याहीपेक्षा पुढे जाऊन असे म्हणता येईल की धार्मिक तत्त्वावर उभारलेल्या समाजावरच संख्याबाहुल्यावर निकाल करावयाची पुष्कळ वेळा पाळी येते. श्रुतिस्मृतीवरून धर्म समजत नाही, कोणा ऋषीचे वचन प्रमाण धरावे याचा