पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१०८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१०२)

निश्चय होत नाही. मला तर धर्मतत्त्व समजत नाही तेव्हा आता महाजनो (बहुसंख्य लोक) येन गतः स पंथाः । असा निकाल काही लोकांनी केलेला दिसतो. तेव्हा पुष्कळांचे पुष्कळ सुख या तत्त्वा अन्वये नीतिनिर्णय केला तर काही विक्षिप्तपणा पदरी येतो. असे मुळीच दिसत नाही. उलट मी दुसऱ्यासाठी का झटावे याचे वेदांताने जे उत्तर दिले आहे तेच फसवे आहे. जे पिंडी तेच ब्रह्मांडी आहे; म्हणजे तू व दुसरा मनुष्य दोघे मूलतः एकच आहा व म्हणून त्याचे कल्याण तेच तुझे कल्याण हे उघड असल्यामुळे तू स्वतः इतकेच दुसऱ्यासाठी श्रम कर असे धर्म सांगतो. पण एक तर हे तत्त्व किती लोकांना पटेल याची शंका आहे आणि दुसरे म्हणजे मी व दुसरा मनुष्य एक म्हणून मी त्याच्या सुखासाठी झटणे हे जसे युक्त तसेच त्याच्या श्रमावर मी जगणे व त्यांच्या धनाचा मी अपहार करणे हेही युक्त ठरू लागेल. कारण आम्ही दोघे एकच. तेव्हा बहूसंख्यांचे सुख या तत्त्वाचा बोध न होणे, लोकांनी त्याचा दुरुपयोग करणे हे जितके शक्य आहे तितकेच 'मी तसा दुसरा' या आत्मौपम्य बुद्धीचा बोध न होणे, तिचा लोकांनी दुरुपयोग करणे हे शक्य आहे. वेदांतातील आत्मौपम्य बुद्धीच्या बाजूने असा एकही आक्षेप या पथावर घेता येणार नाही की जो तिच्यावर तितक्याच जोरात परत फिरणार नाही. आणि शिवाय या पंथांत इतरही अनेक गुण आहेत. म्हणून कोणत्याही समाजात बहुसंख्यांचे जास्तीत जास्त सुख हेच ध्येय असावयास पाहिजे आणि नीती, अनीती व श्रेष्ठकनिष्ठता यावरून ठरविली पाहिजे हे मत मान्य करावयास हरकत नाही असे वाटते.
 पुष्कळांचे पुष्कळ सुख या तत्त्वावरच्या ज्या आक्षेपांचा उल्लेख वर केला आहे ते सर्व टिळकांनी गीतारहस्यांत उद्भावित केलेले आक्षेप आहेत. माझ्या अल्प मतीप्रमाणे त्यांचे जे निरसन मला करता आले, ते त्या महाभागाच्या पायाशी सादर करून पुढील विवेचनास आरंभ करतो.
 बहुसंख्यांचे सुख हे ध्येय ठेवूनही समाजाला मानसिक सुख हेच श्रेष्ठ का मानावे लागते हे आपणांस आता पहावयाचे आहे. प्रत्येक मनुष्य नेहमीच पराकाष्ठचे शारीरिक सुख भोगीन असे म्हणू लागला. तर ते त्याला शक्य नाही असे आपण पाहिले. पण जितके शक्य भोगावयाचे असा जरी त्याने विचार केला तरी समाजाचे त्यांत नुकसान आहे असे दिसेल. शारीरिक