पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१०९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१०३)

सुखाची स्थितीच अशी आहे की, एक मनुष्य जो जो जास्त सुख भोगू लागतो. तो तो दुसऱ्याच्या सुखावर तो आक्रमण करू लागतो. अन्न व वस्त्र ही जी माणसाची अगदी कमीत कमी गरज त्या बाबतीतही असे दिसते की, जाडीभरडी पण पोटभर भाकरी प्रत्येकाला मिळालीच पाहिजे अशी व्यवस्था समाजाला करता येत नाही. आहे त्या अन्नाची वाटणी सारखी केली तर ते सर्वांना पुरेल असे गृहीत धरले तरी ते अगदी जेमतेम पुरेल इतकेच फार तर म्हणता येईल. मग एकाच माणसाने जास्त वाटा मिळविण्याचा प्रयत्न केला तर त्याला दुसऱ्याच्या तोंडचा घास काढूनच तसे करावे लागेल हे उघड आहे. अन्नवस्त्राची ही गोष्ट. मग इतर चैनीच्या वस्तूंबद्दल बोलावयासच नको. मानसिक सुखाची स्थिती याच्या बरोबर उलट आहे. एक मनुष्य शारीरिक सुख जो जो जास्त घेईल तो तो दुसऱ्यांना दुःख होते. पण मानसिक सुख तो जसजसा जास्त घेऊ लागेल तसतसा दुसऱ्यांच्या सुखाला तो कारणीभूत होतो. एकाच्या मानसिक सुखाने दुसऱ्याला त्रास कधीच होत नाही असे म्हणण्याचा मुळीच हेतु नाही. सत्ता चालविणे, दुसऱ्याची टवाळी करणे अशी काही अधम मानसिक सुखेही आहेत. पण अशीही काही मानसिक सुखे आहेत की, ज्यात स्वतःच्या सुखाबरोबरच अनेक जनांचे सुख साधता येते, व शारीरिक सुखे तशी मुळीच नाहीत इतकेच सांगावयाचे आहे.
 उत्तम चित्र काढणे, उत्तम नाटक किंवा कादंबरी लिहिणे, ही मानसिक सुखे आहेत. आणि या सुखाचे स्वरूप न्याहाळले तर असे दिसते की ही कामे करणारा स्वतः तर सुख अनुभवतोच; पण शिवाय इतरांनाही सुख मिळण्याची कायमची व्यवस्था करून ठेवतो; आणि यामुळेच समाज आपल्या जवळची जी अत्यंत श्रेष्ठ देणगी म्हणजे कीर्ती ती त्या माणसाला देऊन कलाकौशल्याची वाढ करण्यास त्यांना उत्तेजन देतो. कीर्ती हे अत्यंत लोभनीय मानसिक सुख आहे. कीर्तीवरची माणसाची भक्ती ओळखून समाजाने तिचा फार सुंदर उपयोग केला आहे. शारीरिक सुख कमी करून माणसाने चंदनासारखे दुसऱ्यासाठी झिजावे व त्याचा मोबदला म्हणून समाजाने त्याची स्तुती करावी, अशी ही रचना आहे यांत दोघांचेही हित आहे. माणसे दुसऱ्यासाठी झटू लागली का समाज स्थिर होतो आणि माणसालाही श्रेष्ठ सुख मिळते. त्यामुळे कीर्तीचा अभिलाष समाजात जितका जास्त निर्माण होईल तितका