पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/११०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१०४)

तो जास्त सुद्दढं म्हणजेच प्रगतिमान् समजला पाहिजे.
 शारीरिक व मानसिक सुखांत दोन ध्रुवांइतके असणारे हे अंतर समाजाच्या फार फायद्याचे झाले आहे. अगदी कनिष्ठ शारीरिक सुखाचा नियमच हा की ते एकाने भोगले की दुसऱ्याच्या आड येते. पण मानसिक सुखाची अगदी अल्प जरी भेसळ केली तरी त्यातील हा दोष कमी होऊ लागतो. गायन, सिनेमा इत्यादि जी अर्धवट शारीरिक व अर्धवट मानसिक सुखे आहेत, त्यांच्यांत मानसिक सुखाच्या भेसळीमुळे केवढे सामर्थ्य आले आहे पहा. उपभोगण्याची व मिळण्याची शक्यता या दोन्ही वाढल्या. श्रीखंड कोणी किती वेळा खावे याला मर्यादा आहे. पण गंधर्वाचे गाणे प्रत्यक्ष व ध्वनिलेखावरून कोणी कितीवेळा ऐकावे याला मर्यादाच नाही असे म्हटले तरी चालेल. सृष्टिसौंदर्य निरीक्षण, रामायणासारख्या सुंदर काव्याचे वाचन हा शुद्ध मानसिक आनंद आहे. हा मिळविण्यास अत्यंत सुलभ व तो अनुभवण्याची माणसाच्या ठायीची शक्ती अमर्याद आहे. म्हणूनच लोकांना काव्यरसाची गोडी लावणे, किंवा सृष्टिसौंदर्याची आसक्ती त्यांच्याठायी वाढविणे याला समाज फार महत्त्व देतो. ज्या मानाने समाजांत रसिकता वाढेल, त्या मानाने तो थोडा जास्त सुखी होतो. कारण मानसिक सुखाची शक्यता त्यामुळे थोडी वाढते. तेव्हा कलाकौशल्याची वाढ हे समाजाच्या सुखात भर घालण्याचे एक साधन आहे, व त्याची प्रगती मोजण्याचे ते एक माप आहे असे समजण्यास हरकत नाही. पण आपले समाजशास्त्रज्ञ रा. गो. म. जोशी यांना हे मत पसंत नाही. वाङ्मय, कलाकौशल्य, यांची वाढ होणे हे समाजाच्या अव्यवस्थेचे लक्षण आहे असे त्यांचे मत आहे कामविकाराची पूर्ती त्या समाजात होत नसल्याचे ते द्योतक आहे, असे ते म्हणतात. (हिंदूचे. समाजरचनाशास्त्र पान ३४७) आता आर्यसंस्कृतीत कामपूर्ती कधीच होत नसली पाहिजे असे यावरून अनुमान निघेल, कारण भारतीयांनी कला-कौशल्य परिपूर्णतेला नेले होते असा इतिहास आहे. पण असे कड्याळ आपल्यावर येऊ नये म्हणून जोशांनी वरच्या उलटही लिहून ठेवण्याची व्यवस्था केली आहे. वाङ्मय, कलाकौशल्य, तत्वज्ञान यांची वाढ करणारा जो समाजातील बुद्धिमान वर्ग त्याचे समाजाने बिनतक्रार पोषण केले पाहिजे असेही ते म्हणतात. (पान ५५) यावरून जोशी कसे मनोरंजक लिहितात हे कळून येईल. संस्कृती व प्रगती