पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१११

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१०५)

या विषयावर त्यांनी ग्रंथात जे ठायीठायी विवेचन केले आहे, ते सर्व एकत्र करून रंगभूमीवर म्हटले तर भ्रमाच्या भोपळ्यापेक्षाही जास्त करमणूक होईल यात शंका नाही. प्रगती वगैरे सर्व आभास असून वंशपरंपरा संस्कृतिरक्षण हेच संस्कृतीचे (?) आद्य ध्येय आहे असे त्यांस वाटते. (पान ४३७) पण यावरून निग्रो, कातकरी यांच्यापेक्षा चांगल्या प्रतीच्या जीवनाची हिंदूंना अपेक्षा आहे, असे कोणास वाटेल; पण तसे नाही. नुसते जीवन हे तत्त्व मागे पडून चांगल्या तऱ्हेने जीवन हे तत्त्व पुढे येणे त्यांना पसंत नाही. (१७५) अशा तऱ्हेने जगणे हा वैयक्तिक अभिरुचीचा प्रश्न आहे. तो येथे घुसडू नये असे म्हणतात. (पान ४१४) पण हिंसाप्रिय सृष्टीत त्याचे नामरूपाने शिल्लक रहाणे हे मात्र त्यांना हवे आहे. बरे हिंदूचे तेच नामरूप म्हणजे वेदकाळचे, कां कृष्णांच्या काळचे, का औरंगजेबाच्या काळचे, का सध्याचे हे त्यांनी कोठेच सांगितले नाही. कदाचित गणितागत पद्धतीने पुढील ग्रंथांत सांगणार असतील. कलाकौशल्य हे त्यांच्या संस्कृतीत येते व येत नाही असे आपण पाहिलेच. युद्धाची आयुधे चांगली असणे हेही त्यांच्यामते श्रेष्ठत्वाचे द्योतक नाही. (४५) दूरदर्शीपणा व अभिमान हे गुण वंशवृद्धीला हानिकारक आहेत. (३३७) तेव्हा तेही संस्कृतीत येत नसतीलच मग संस्कृती म्हणजे काय तर धर्म (४१५) आणि धर्म म्हणजे काय तर मानवाची बुद्धी खुंटली, डोळे मिटले व कान बंद झाले म्हणजे होणारे ज्ञान ! (७६) पिंडप्रगति व सांस्कारिक प्रगती यावरचे त्यांचे सुंदर काव्य वाचताना कवीच्या बुद्धीचा स्फूर्तीमध्ये लय होत असल्याबद्दल आपल्याला शंकाच रहात नाही. त्या बाबतीत कवीला माझी एवढीच विनंती आहे की, या दोन प्रकारच्या प्रगतीत तोल राखणे हे जे कर्तव्य म्हणून त्याने सांगितले आहे, त्याचाानीट बोध होण्यासाठी किती पिंडप्रगतीला किती सांस्कारिक प्रगती असावी याचे एक कोष्टक तयार करून त्याने प्रसिद्ध करावे असो.
 मानसिक सुखाची आवड समाजात वाढत जाण्यामध्ये समाजाचा आणखी एक फार मोठा फायदा आहे. या आवडीमुळेच समाजात अत्यंत उपयुक्त ज्ञाने व विज्ञाने निर्माण होतात. समाज वाढत चालला की त्याच्यापुढे अनेक तऱ्हेचे प्रश्न येऊन पडतात. ज्या अनेक व्यक्ती सुखासाठी व संरक्षणासाठी एकत्र आलेल्या असतात त्यांचे स्वभाव, आवडीनावडी अत्यंत