पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/११२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१०६)

भिन्न प्रकारच्या असतात. असल्या तऱ्हेच्या व्यक्तीना एकत्र वागविणे हे समाजात अत्यंत कठिण कर्म होऊन बसते. दोन माणसे एकत्र आली की नीती अनीतीचे प्रश्न निर्माण होतात. अनेकांनी एकत्र खपून संपत्ती निर्माण केली की तिच्या वाटणीचे प्रश्न निर्माण होतात. या सर्व प्रश्नांचा विचार करण्यासाठी दीर्घकाल ज्यांनी याच विषयाचा व्यासंग केला आहे, अशा पंडितांची समाजाला जरूर असते. आणि शरीरसुखात मग्न झालेल्या लोकांकडून हे व्यासंग होणे अशक्य असल्यामुळे त्यापेक्षा श्रेष्ठ सुखाची ज्यांना आवड असते, अशी माणसे समाजाला हवी असतात. कीर्ती हे सुख मोबदल्याच्या रूपाने समाज त्यांना देतो. तेही आपले बुद्धिसर्वस्व खर्च करून समाजाला उपयुक्त अशी ज्ञाने निर्माण करतात. किंवा चंदनासारखे झिजून समाजकल्याण साधतात.
 जास्तीत जास्त लोकांचे सुख हे ध्येय ठेवले तरी पराकाष्ठेच्या स्वार्थत्यागाची प्रवृत्ती व तीक्ष्ण बुद्धी यांची समाजात वाढ होणे कसे शक्य आहे व इष्ट आहे ते वरील विवेचनावरून ध्यानात येईल असे वाटते. याचा अर्थ असा मात्र नव्हे की स्वार्थत्यागी, पराक्रमी किंवा बुद्धिमान पुरुष आपापली कार्ये करतात त्या वेळी वरील मीमांसा त्यांच्या ध्यानी असते. आपल्या अमुक एका प्रवृत्तीचा मूळ उगम कशात आहे व तिचे अंतिम फलित काय याचा विचार सामान्य मनुष्य तर नाहीच करीत; पण थोर पुरुषही बहुशः करीत नसतो. कोणच्याही ध्येयाने प्रवृत्त झालेल्या समाजात हीच स्थिती असते. समाजात शतकातून एकादा निर्माण होणारा तत्त्ववेत्ता मात्र या प्रवृतीचा अभ्यास करतो, व समाजसुखाच्या दृष्टीने त्यांना इष्ट वळण लावून देतो. एखादा गोड आंबा खात असताना त्याच्या झाडाला खते कसली घातली होती याचा विचार जसा आपण करीत नाही व करणे जरूर नसते तशीच समाजाच्या मूलतत्त्वांची विवंचना बहुसंख्य लोक करीत नाहीत व त्यांनी करण्याची जरूरही नसते. आंब्याचा माळी मात्र आंब्याची निगा राखून कोणचे आंबे समाजात किती पसरू द्यावे या विचारांत रात्रंदिवस चूर असतो. कार्यकर्त्याला आपल्या कृतीचे आद्यंत माहीत नसतात इतकेच नव्हे तर तत्त्ववेत्त्यालाही प्रत्येक कृतीचा समाजसुखाच्या दृष्टीने नेमका उपयोग काय हे सांगता येईलच असे नाही. मनुष्य सत्यनिष्ठ राहिला तर आपण त्याचे अभिनंदन करतो. पण दर वेळच्या त्याच्या सत्य भाषणाने समाजाला नेमका फायदा काय हे