पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/११३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१०७)

आध्यात्मिक पद्धतीतही सांगणे शक्य नाही. तेच या पद्धतीत होते. बहुसंख्यांचे सुख या ध्येयानुसार रचलेल्या समाजात दोष दाखवून या पद्धतीचा उपहास करणाऱ्यांनी अतींद्रिय तत्त्वावर जी समाजरचना असेल तिच्यात हे दोष जसेच्या तसे सापडतील हे ध्यानात ठेवले तर पुष्कळच वाद मिटेल असे वाटते.
 मानसिक सुखाची वाढ होणे याची समाजाला अत्यंत जरूर आहे हे जरी खरे, तरी मानसिक सुख हे शारीरिक सुखाची सर्व जागा घेऊ शकेल हे अशक्य आहे. मानसिक सुख कितीही वाढले तरी शरीरसुखाची भूक कधीही थांबणार नाही. शारीरिक सुखाच्या आसक्तीला मुरड घालणे एवढेच समाजाला शक्य आहे. म्हणून अन्न-वस्त्र व एकंदर संपत्ती समाजाला पुरेशी निर्माण करणे व तिची योग्य वाटणी करणे हे समाजाचे आद्य कर्तव्य आहे. माणसांची कामेच्छा भुकेइतकीच प्रबल असते. म्हणून तिचाही विचार समाजात झाला पाहिजे. ही व्यवस्था कोणी कशी केली व ती उत्तम आहे की नाही हे कशावरून ठरवावयाचे याचा विचार आता करावयास हवा. तसेच श्रेष्ठकनिष्ठतेच्या आणखी एक दोन फार महत्त्वाच्या कसोट्या राहिल्या आहेत. त्यांचाही विचार केला पाहिजे. तो करून त्याअन्वये विद्यमान राष्ट्रामध्ये श्रेष्ठकनिष्ठता कशी ठरविता येईल हे पाहाणे व संस्कृती व प्रगती यांच्या खऱ्या स्वरूपाचे विवेचन करणे एवढा भाग या विषयाचा अजून राहिला आहे.
 सुख हेच मानवजातीचे ध्येय आहे असे वरील विवेचनात पाहिले; उदात्त कल्पनांच्या प्रसारासाठीच ज्याचे अस्तित्व, तो धर्मसुद्धा यापेक्षा निराळे ध्येय मानवाला सांगू शकत नाही. परमेश्वराचा ही सृष्टी निर्माण करण्यात काय हेतू आहे, हे पाहून मग त्याअन्वये मानवाने आपले ध्येय ठरवावे असे म्हणणाऱ्यांचा एक पक्ष आहे. त्याचा आपण विचारही केला नाही. पण त्याचे कारण उघड आहे परमेश्वराचा हेतू काय आहे हे अजून तरी कोणालांच कळलेले नाही. व त्या बाबतीत गंभीर वाणीने बोलणारे लोकही त्याचे हेतु व कृती अतर्क्य आहेत असेच म्हणतात. त्यामुळे आपल्या काय किंवा कोणाच्याही काय, विचारकक्षेच्या आत परमेश्वराचा हेतू बसतच नाही. सुख हे ध्येय ठरविले तरी त्या दृष्टीने सुद्धा वाङ्मय, कलाकौशल्य, स्वार्थत्यागाची प्रवृत्ती इत्यादि श्रेष्ठ गुणांची वाढ होणे कसे इष्ट आहे हेही आपण पाहिले