पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/११४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१०८)

व त्यावरून समाजाच्या श्रेष्ठकनिष्ठतेचे काही गमक, काही मानदंड ठरविण्यांचा प्रयत्न केला. पण या मानदंडाची उपयुक्तता पूर्ण होण्यास आणखी काही महत्त्वाच्या गोष्टीचा विचार करणे अवश्य आहे. तेव्हा त्याकडे आता वळले पाहिजे.

राष्ट्र आणि व्यक्ति.

 भोवतालच्या क्रूर सृष्टीत मनुष्याला जगावयाचे असेल तर समाज करून राहण्यावाचून त्याला गत्यंतर नाही शरीराने तो अत्यंत दुबळा आहे व ज्या बुद्धीच्या जोरावर निसर्गाशी व इतर प्राणिमात्राशी झगडावयाचे तिच्या विकासाला समाजाची अत्यंत आवश्यकता आहे. म्हणूनच समाज करून राहाणे मनुष्याला अत्यंत आवश्यक आहे. आत्मसंरक्षणासाठी मनुष्याने निर्माण केलेल्या मानवसंघाच्या काही विशिष्ट स्वरूपाला आपण अलीकडे राष्ट्र असे नाव देतो. या राष्ट्रकल्पनेचा आपणास थोडासा विचार करावयाचा आहे.
 एकत्र आलेल्या माणसांची संख्या किंवा त्यांनी व्यापिलेले क्षेत्रफळ यावर राष्ट्रकल्पना अवलंबून नाही. स्विट्झरलंडची लोकसंख्या तीस लक्ष असून क्षेत्रफळ १५ हजार चौरस मैल आहे. साम्राज्य सोडून दिले तरी नुसत्या चीनची वस्ती ३७ कोटी असून क्षेत्रफळ १५ लक्ष चौरस मैल आहे. तरी या दोहीना राष्ट्र हीच संज्ञा आपण देतो. इंग्लंड, इटली, जपान, जर्मनी या पराक्रमी राष्ट्रांचा विचार केला तरी चार कोटींपासून सात कोटींपर्यंत त्यांच्या लोकसंख्या कमीअधीक आहेत. मावरून लोकसंख्या किंवा क्षेत्रफळ यावर राष्ट्रकल्पना अवलंबून नाही हे स्पष्ट दिसते. हे जरी खरे तरी कोणच्याही मानवसंघाला राष्ट्र म्हणता येईल असे नाही. युरोप व युनायटेड स्टेटस् यांचे क्षेत्रफळ जवळजवळ सारखेच आहे. पण त्यांतील एक राष्ट्र आहे व दुसरे नाही. वाटेल त्या शब्दसमूहाला आपण वाक्य म्हणत नाही. ज्यांतील शब्द एकमेकांशी काही नात्यांनी जोडलेले आहेत व जो काही पूर्ण अर्थ सांगतो त्याच समूहाला आपण वाक्य म्हणतो. राष्ट्राचे काहीसे तसेच आहे. ज्यांची सुख-दुःखे एक आहेत, जे अनेक कारणांनी व अनेक प्रसंगी एकमेकांशी समरस होऊ शकतात त्या लोकांच्या संघाला फक्त राष्ट्र म्हणता येईल. आणि