पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/११५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१०९)

या सर्वांचे कारण इतकेच की त्या सर्वांना मिळून आत्मसंरक्षणाचे एकच कार्य करावयाचे असते. ते नसते तर कोणच्याही मानवसमूहाला राष्ट्र म्हणण्यास हरकत नव्हती. किंवा उलट असेही म्हणता येईल की राष्ट्र या कल्पनेचा तेव्हा उदयच झाला नसता. संरक्षणासाठी गटाने राहण्याची फार पुरातन काळी मानवाने जी पद्धत सुरू केली तिचेच राष्ट्र हे परिणत स्वरूप आहे, आणि आपणाहून अत्यंत विभिन्न लोकांशी तोंड देण्याचे प्रसंग जो जो जास्त येतात तो तो या राष्ट्र या कल्पनेची जरूर जास्त पडू लागते. म्हणून मागल्या काळी जरी या कल्पनेवाचून आपण जगू शकलो असलो तरी यापुढे ते शक्य आहे असे म्हणण्यांत अर्थ नाही.
 आत्मरक्षण, बुद्धी व भावना यांचा विकास आणि त्यायोगे जास्तीत जास्त सुखप्राप्ती या हेतूनेच मनुष्य समाज करतो व त्या समाजाचे परिणत स्वरूप म्हणजेच राष्ट्र हे जर ध्यानात घेतले तर त्या संघांत येणाऱ्या व्यक्तिमध्ये जितके जास्त साम्य असेल तितके अधिक हितप्रद होईल, याबद्दल कोणी वाद करील असे वाटत नाही. एकाचे जे सुखदुःख किंवा मनापमान तेच दुसऱ्याचे अशी स्थिति जितकी जास्त असेल तितके ते राष्ट्र जास्त संघटित व समर्थ असेल यांत शंकाच नाही. हे विचार अगदीच साधे आहेत. पण आज एका बाजूने सनातनी व दुसऱ्या बाजूने कम्युनिस्ट लोक या कल्पनेचा उपहास करीत आहेत, म्हणून त्याचा विचार करणे अवश्य आहे.
 राष्ट्र म्हणून एकत्र आलेल्या माणसांची स्थिती ही काठ्यांच्या जुडग्यासारखी आहे. काठ्यांना जितक्या जास्त दोरांनी बांधावे तितके त्यांचे जुडगे जास्त भक्कम होते. त्याचप्रमाणे या माणसांना एकत्र बांधणारे धागे जितके जास्त व जितके जास्त चिवट, त्या मानाने ते राष्ट्र जास्त संघटित व जास्त- सबल होईल. एकत्र आलेले लोक (१) एक रक्ताचे असणे (२) एक धर्माचे असणे (३) त्यांच्या पूर्वपीठिका व इतिहास एक असणे (४) त्यांची भाषा एक असणे (५) व त्या सर्वांना उन्नतीची सारखी संधी मिळणे हे पाच धागे राष्ट्रांतील लोकांना एकत्र बांधण्यास फार उपयोगी पडतात असे आतापर्यंतच्या इतिहासावरून आढळून आलेले आहे. यापैकी एकदा धागा तुटताच राष्ट्र विस्कटते असे नाही; पण जितके जास्त धागे जिवंत तितके राष्ट्राचे सामर्थ्य जास्त हे निर्विवाद आहे. कारण सुखप्राप्ती च दुःखनिरास यांसाठी माणसे