पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/११६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(११०)

एकत्र येतात, व माणमांची सुखदुःखे सारखी असणे हे वरील पाच गोष्टींवर फारच अवलंबून आहे.
 'Workers of the world, unite' हे अगदी भोळे तत्त्वज्ञान आहे. खाणीत काम करणाऱ्या इंग्रज मजुराला चैनीत लोळणारा इंग्रज मालक हा हाडवैरी वाटतो हे खरे; पण आफ्रिकेच्या जंगलात काम करणारा काळाकुट्ट घाणेरडा निग्रो त्या इंग्रज मजुराला जवळचा वाटेल, आपला बांधव आहे असे वाटेल, हे खोटे आहे. निग्रो व इंग्रज मजूर यांच्यातील वैषम्याची दरी दुर्लंघ्य आहे. उलट इंग्रज मजूर व इंग्रज मालक यांच्यातील दरी काही सामाजिक व्यवस्थेमुळे निर्माण झालेली असून एका पिढीतच ती इतकी पालटू शकते की तोच मालक त्याच मजुराला आपली मुलगी आनंदाने देऊ शकतो. एकरक्ततेचा प्रभाव हा असा आहे व तो मान्य न करता उभारलेले कोणचेही तत्त्वज्ञान व्यासपीठापलीकडे जाऊ शकणार नाही. धर्म, भाषा, पूर्वपीठिका, इतिहास या प्रत्येक बाबतीत असेच आहे. जो जो हे जास्त भिन्न तो तो माणसे एकमेकांपासून दुरावतात आणि समाज विसंघटित होतो. जो जो यातील साम्य वाढेल तो तो राष्ट्र जास्त सामर्थ्यसंपन्न होईल
 आपल्या हिंदु राष्ट्राला या पांच धाग्यांपैकी कोणच्या धाग्यांनी बांधलेले आहे हे पाहिले तर, यापैकी कोणचाही एक धागा येथे नाही, इतकेच नव्हे तर तसा धागा नसलाच पाहिजे, असे धार्मिक लोक सांगत आहेत असा विचित्र देखावा दिसून येतो. हिंदु राष्ट्र, हा शब्द मी उगीच वापरला आहे. असे एकादे राष्ट्र मागे कधी होते किंवा पुढे कधी होऊ शकेल असे मला वाटत नाही. पण हल्ली लोक तसे म्हणतात हे एक आणि दुसरे असे की अखिल हिंदुस्थानाची जी स्थिती तीच त्यांतल्या कोणच्याही बारक्या तुकड्यांची, म्हणजे महाराष्ट्र, बंगाल इत्यादी देशांची आहे. म्हणून सर्व हिंदुसमाजाबद्दल विवेचन केले म्हणजे तेच थोड्याफार फरकाने महाराष्ट्राला लागू पडणार असल्यामुळे तसे करण्यास हरकत नाही असे वाटते.
 एकरक्तता या राष्ट्रात मुळीच नाही. आणि बुद्धी व रंग या बाबतीत येथे इतके भिन्न लोक एकत्र जमले आहेत की ती घडवून आणण्याचे प्रयत्न हितप्रद होणार नाहीत. पण याचा अर्थ असा नव्हे की जेवढा फुटीरपणा आज आहे. तितका अवश्य आहे. अशा कित्येक जाती येथे आहेत की ज्यांची