पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/११७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१११)

रक्ते मिसळण्यास मुळीच हरकत नाही. जितके जास्त लोक एकरक्ततेने बांधले जातील तितकी त्यांची सुखदुःखे सारखी होतात. व तेच आपणास साधावयाचे आहे. असे असताना पाश्चात्य शास्त्रज्ञांचे खोटे आधार घेऊन मिश्रविवाह होऊ नयेत असे काही वेडगळ लोक सांगत आहेत व मोठेमोठे धर्ममार्तंड त्यांना आशीर्वाद देत आहेत.
 जी स्थिती रक्ताची तीच धर्माची. संघटनेच्या दृष्टीने पाहिले तरं हिंदुराष्ट्र या शब्दाला जितका अर्थ आहे तितकाच हिंदुधर्म या शब्दाला माहे. म्हणजे मुळीच नाही. तत्त्वज्ञानात असा एकही विचार नाही व नीती व कर्मकांड यांत असा एकही विचार नाही की जो सर्व हिंदू सारखाच पाळतात. इतकेच नव्हे तर तसा विचार किंवा आचार नसलाच पाहिजे असा सनातन धर्म आहे. ब्राह्मणांचे आचार निराळे, क्षत्रियांचे निराळे, वैश्यांचे निराळे, शूद्रांचे निराळे. कांही लोक म्हणतात की प्रत्येकाची कामे जर निराळी आहेत तर त्यांना त्यांना भिन्न आचार असणे युक्तच आहे. पण या म्हणण्यांत अनेक हेत्वाभास आहेत. एक तर वर्णाप्रमाणे कामाची विभागणी करणे हेच चूक आहे असे वृत्तिसंकराचा विचार करताना आपण पाहिले आहे. आणि दुसरे असे की कामाची विभागणी केली असे गृहीत धरले, तरी कित्येक आचार असे की त्यांचा धंद्याशी कांहीच संबंध नाही. गायत्री मंत्रांचा जप जर सुबुद्धी देतो, तर कोळ्याला किंवा परटाला तो कां सांगू नये ? आपले सर्व धार्मिक आचार वेदमंत्रपूर्वक करण्यास शूद्रातिशूद्रांनासुद्धा का अधिकार नसावा ? पण शूद्र तर दूरच राहिले. शिवछत्रपतीच्या कुळात जन्मलेल्या कोल्हापूरच्या भोसल्यांनासुद्धा तो अधिकार नाही. लखलखीत ज्ञानमय परब्रह्माच्या उपासकापासून तो थेट मरीआईच्या उपासकांपर्यंत सर्व लोक हिंदुधर्मात आहेत. सात जन्म एकच पति मिळावा, यासाठी व्रते करणाऱ्या स्त्रियापासून एकाच जन्मी मुदतीच्या कराराने सात नवरे करणाऱ्या स्त्रीपर्यंत सर्व प्रकारच्या स्त्रिया येथे आहेत. ब्राह्मणांची विवाहपद्धती निराळी, क्षत्रियांची निराळी, त्यांचे अध्ययनाचे वय व अधिकार वेगळे, त्याच्या स्वच्छतेच्या कल्पना वेगळ्या. इतकेच नव्हे तर त्यांची वस्त्रे नेसण्याची पद्धतही वेगळी असावी असे शास्त्र आहे. आणि आचारस्वातंत्र्य या गोंडस नावाखाली सनातनी लोक त्याचे समर्थन करतात. पण हिंदुधर्मात आचारस्वातंत्र्य आहे ही