पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/११८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(११२)

थाप आहे. निरनिराळे आचार येथे आहेत इतकेच खरे आहे. त्या त्या समूहाच्या ठरलेल्या आचाराबाहेर मनुष्य गेला तर समाज ते मुळीच सहन करीत नाही आणि हे नियम लग्नविधीपासून पाणी पिण्यापर्यंत सारखेच कडक समजले जात असत. सर्व हिंदूंना इतरांपासून स्पष्टपणे निवडून दाखवील असा, सर्वांना एका कक्षेत आणील असा आचार, विचार धर्मग्रंथ किंवा देव, एकही नाही; आणि नसलाच पाहिजे असा धर्म आहे. हिंदूचे, हिंदुधर्माचे जे आचार म्हणून आपण म्हणतो, व उत्तम आचार म्हणून ज्याची स्तुती करतो ते सर्व कांही ठरीव वर्गाचे आहेत. स्नानसंध्या, सोवळेओवळे, उपनयन, वेदपठन या थोर आचारांची स्तुती करणारे लोक सर्व हिंदूंचे हे आचार आहेत अशा स्वरांत बोलतात. हा स्वर हा त्यांचा भ्रम खरा ठरावा, शूद्रांपर्यंत सुद्धा वेदमंत्र पोचावे यातच वास्तविक हित आहे. पण तसे ते कधीही सुखाने होऊ देणार नाहीत. हे आचार सर्वांचे आहेत, असे उगीचच भासविण्यात मात्र काही अर्थ नाही हिंदूंच्या श्रेष्ठ आचारांची स्तुती करताना रा. गो. म. जोशी म्हणतात की खरा हिंदु रोज स्नान केल्यावाचून राहु शकत नाही. हे अज्ञान त्यांनी कोठून चोरले, याबद्दलची थाप त्यांनी लवकरच प्रसिद्ध केलेली बरी. हिंदूधर्माची व्याख्या करण्याचा अनेक पंडितांनी प्रयत्न केला आहे. पण समर्पक अशी व्याख्या अजून एकही झालेली नाही, व होणे शक्य नाही. कारण सर्व हिंदूंना सारखे असे काहीच नाही.
 पूर्वपीठिका आणि पूर्वजांचा इतिहास या बाबतीत तीच निराशाजनक स्थिती आहे. येथे एक गोष्ट लक्षात ठेवावयास हवी. ती अशी की हिंदूंचा धर्म, त्यांची संस्कृती, त्यांचा पूर्वेतिहास व पूर्वपीठिका या अत्यंत उज्ज्वल अशा आहेत याबद्दल वाद नाही. दोष आहे तो एवढाच की, त्या सर्व जुन्या मिळकतीची मालकी फक्त काही विशिष्ट वर्गाकडे आहे. त्यामुळे सर्व समाजाला तिचा कडकडून अभिमान वाटत नाही आणि म्हणून संघटना करणे हे जे अत्यंत महत्त्वाचे तिचे काम ते ती करू शकत नाही. येथे ज्या अनेक जाती आहेत त्यांची रक्ते तर भिन्न आहेतच, पण त्यांच्या अभिमानाची केंद्रेही भिन्न आहेत. पूर्वपीठिका जितक्या एक व पूर्वजांच्या पराक्रमाचा अभिमान जितका जास्त पसरलेला तितका तो समाज जास्त संघटित होतो पण आम्ही एकमेकापासून इतके फुटलेले आहो की, एकाला दुसऱ्याच्या