पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/११९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(११३)

पूर्वपीठिका व पूर्वज यांच्याबद्दल अभिमान नाही. इतकेच नव्हे तर तिटकारा आहे. विक्रमादित्य हा माझा आहे असे वाटून त्याच्याबद्दल मला जो अभिमान वाटतो त्याला दोन कारणे असू शकतात. तो माझ्या रक्ताचा असेल तर त्याचा पराक्रम म्हणजे माझाच पराक्रम आहे, माझे रक्त तितकेच पराक्रमी आहे हा आत्मविश्वास माझ्या ठायी निर्माण होतो व जगही माझ्याकडे त्या दृष्टीने पाहू लागते. या दुहेरी ऋणामुळे मला त्याचा अभिमान वाटतो. एकरक्तता नसली तरी त्याची माझी सुखदुःखे जर एक असतील म्हणजे तो राजा झाल्यामुळे माझ्या सुखात जर जास्त भर पडणार असेल, तर मला त्याच्याबद्दल अभिमान वाटतो. या बाबतीत अखिल हिंदुसमाजाची स्थिती वाईट असली तरी महाराष्ट्राची स्थिती बरीच समाधानकारक आहे. गेल्या दोनतीन शतकांत भिन्न भिन्न क्षेत्रांत मराठ्यांनी जो पराक्रम केला त्याचे श्रेय अनेक जातींना असल्यामुळे हे वैभव आमचे आहे असे बहुसंख्य समाजाला वाटावे अशी स्पृहणीय स्थिती येथे झाली आहे. धार्मिक क्षेत्रांत ज्ञानेश्वर, एकनाथ या ब्राह्मणांच्या जोडीला तुकाराम, नामदेव हे ब्राह्मणेतर अगदी बरोबरीच्या मानाने बसू शकले व राजकीय क्षेत्रांत संताजी, धनाजी यांच्या बरोबरीनेच प्रतिनिधी व पटवर्धनांनी उडी घेतली यामुळे अमुक मिळकत अमक्या जातीची असा दुजाभाव राहिला नाही व मराठी साम्राज्य वैभवाला चढूं शकले. हे जे आपोआप घडून आले तेच शास्त्रशुद्ध पायावर, नवीन तत्त्वज्ञान उभारून मुद्दाम घडवून आणावयास हवे आहे. म्हणजे भेदाचे व दुहीचे भूत पुन्हा या देशाला झपाटू शकणार नाही. तुकारामाच्या व नामदेवाच्या वाणीलाच वेद म्हटल्यानंतर भोसले कुळातल्या माणसाला वेदमंत्र नाकारणे यात कोणचा शहाणपणा आहे ? पुष्कळ लोक म्हणतात तशी ही बाब लहान नाही. या बारीक गोष्टींच्या मागे अभिमानाचे तीव्र पीळ आहेत व त्यामुळेच भेदाच्या धारेला विषारी कटुता येते. राष्ट्रीय पीठिका एक असूनसुद्धा ब्राह्मणांना अत्यंत वंद्य वाटणाऱ्या रामदास, विष्णुशास्त्री, टिळक, अशा ज्या विभूती त्यांना; ब्राह्मणेतर अत्यंत घाणेरड्या शिव्या देऊ शकतात व ते विशिष्ट लोक बेजबाबदार म्हणून सोडून दिले तरी उरलेल्या समाजामध्ये बारीक भेदाचे पडदे कसे पडत गेले आहेत याची जाणीव त्यामुळे झाल्यावाचून राहात नाही. आज सावतामाळी, बांकामहार इत्यादि कमी