पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(११४)

अधिक उंचीचे पण आपापल्या जातीचे पुरुष घेऊन ती ती जात त्यांची पूजा करते ही गोष्ट दुर्लक्षणीय खास नाही. इतर थोर पुरुषांची पूजा केली तरी आपल्या जातीतल्या पुरुषांची पूजा करणे युक्तच आहे हे खरे, पण वरील पूजेचा इतका साधा अर्थ नाही. व्यासवाल्मिकि, रामदास, ज्ञानेश्वर हे महापुरुष या जातींना जवळचे वाटत नाहीत; ते फारच दूरचे असल्यामुळे त्यांच्या पराक्रमामुळे यांना स्फूर्ती व तेज चढत नाही; ते पराक्रमी म्हणूनच आम्ही पराक्रमी असे त्यांना म्हणता येत नाही व सांवता माळी किंवा इतर सत्पुरुष यांच्याबद्दल तसे म्हणता येते हे कारण या पूजेच्या बुडाशी आहे. ब्राह्मणा ब्राह्मणांतसुद्धा हे आडपडदे आहेत. पेशवेपटवर्धनांचा कोकणस्थांना जितका अभिमान वाटतो तितका देशस्थांना वाटत नाही व प्रभू लोकांपैकी पुष्कळांना तर हे आपले शत्रूच वाटतात. यावरून असे दिसेल की एकरक्तता नसली तरी ज्यांना एक राष्ट्र म्हणून रहावयाचे आहे त्यांनी आचार, पूर्वपीठिका यांच्या साह्याने सर्व समाज शक्य तितका एका पातळीवर आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जे जुने ठेवणे असेल ते माझे आहे असे प्रत्येकाला अभिमानाने सांगता आले तर समाजाला एकरूपता व त्यामुळेच सामर्थ्य जास्त येते, याबद्दल कोणी वाद करील असे वाटत नाही.
 राष्ट्रामध्ये जे लोक एकत्र जमले असतील त्यांना एकमेकांबद्दल आपलेपणा वाटावयास रक्त, धर्म, व पूर्वपीठिका यांचे धागे नसले तरी यांच्या भावामुळे निर्माण होणारे दोष काही एका व्यवस्थेने काढून टाकणे बरेचसे शक्य असते. उन्नतीच्या सर्व क्षेत्रात वाटेल तितके उंच चढण्यास प्रत्येक व्यक्तीला सारखी संधी देणे, ही ती व्यवस्था होय. माझ्या अंगी कर्तृत्व विद्वत्ता व योग्यता असूनही केवळ जातीने मी कोळी किंवा गवंडी आहे एवढ्याच कारणासाठी जर मला राजपद, किंवा शंकराचार्याचे पद मिळणार नसेल, तर हा हिंदु समाज जवळचा व चिनी किंवा इराणी समाज लांबचा, असे मला का वाटावे ? जे जे मानाचे व वैभवाचे पद या राष्ट्रात असेल, तेथपर्यंत जाण्याची मोकळीक प्रत्येक कर्तृत्ववान् व्यक्तीला असली तरच हे राष्ट्र माझे आहे व त्याच्या उन्नतिअवनतीची जबाबदारी माझ्यावर आहे. ही जाणीव तिला होईल. व अशी व्यवस्था असली म्हणजे राष्ट्राच्या अग्रभागी चमकणाऱ्या पुरुषांत प्रत्येक जातीचा प्रतिनिधी दिसत असल्यामुळे प्रत्येक