पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(११५)

क्षेत्र सगळ्यांचे व सगळी क्षेत्रे प्रत्येकाची अशी स्थिती निर्माण होते. आणि त्यामुळेच आपलेपणा वाढतो. भिन्नधर्ममते, श्रीमंती, दारिद्रय, यामुळे कोणच्याही राष्ट्रात भिन्नभिन्न गट पडलेले असतातच. पण त्या भिन्न गटांतील कोणाही व्यक्तीला समाजातल्या कोणच्याही उच्च पदाला जावयास मोकळीक असते. परिस्थितीने अडचण येईल तर निराळी. पण तशी अडचण आली तर ते दुर्दैव आहे, अन्याय आहे. समाजाची तशी व्यवस्था नसली पाहिजे हे तत्व तेथे सर्वमान्य असते. तसे असणे हीच समाजाची व्यवस्था, हेच आमच्या मोठेपणाचे लक्षण असे मानणे निराळे आणि नाइलाजाने तसे होणे निराळे. पौर्वात्य व पाश्चिमात्य समाजाची विभागणी कशी भिन्न आहे, हे रिस्लेने फार सुंदर रीतीने स्पष्ट केले आहे. पौर्वात्य समाजाला विभागणारे तक्ते आडवे आहेत. म्हणजे येथे अगदी खालच्या थरांतल्या माणसाला वरच्या थरात केव्हांच येता येत नाही. पश्चिमेतील समाज विभागणीच्या भिंती उभ्या आहेत. म्हणजे तेथे गट कितीही भिन्न असले तरी तळचा मनुष्य अंगी कर्तृत्व असेल तर वरपर्यंत जाऊ शकतो. या व्यवस्थेमुळेच समाजांतल्या सर्व गटांतील व्यक्तीच्या कर्तृत्वाला वाव मिळतो. महाराष्ट्राला थोडेसे जे राष्ट्रस्वरूप प्राप्त झाले आहे, ते या तत्त्वाचा अवलंब केल्यामुळेच झाले आहे. शिवाजी, बाजी या थोर पुरुषांनी वाटेल त्याला आऊत सोडून राऊत व्हावयास संधी दिली, इतकेच नव्हे तर मेंढ्या सोडून राजपदावर चढण्यालाही उत्तेजन दिले. याबद्दल हे राष्ट्र त्यांचे सदैव ऋणी राहील. वर्णाश्रमधर्माचे घातकी तत्त्व जर महाराष्ट्राने पाळले असते तर वर्णाश्रमधर्म हे शब्दही कदाचित् ऐकू आले नसते. या विषयासंबंधी जीवनशास्त्रदृष्ट्या जो प्रश्न उपस्थित होतात त्यांचा विचार अनुवंश व रक्तसंकर या आरंभीच्या दोन लेखांत केलेलाच आहे व त्या शास्त्राप्रमाणेही सर्वांना सारखी संधी हेच तत्त्व कसे हितप्रद ठरते, हे दाखविले आहे. येथे फक्त राष्ट्रसंघटनेच्या दृष्टीनेच त्याचा विचार करावयाचा आहे. राष्ट्राने मिळविलेले वैभव, कीर्ती, ही माझी कीर्ती आहे, ही राष्ट्रीय संघटनेला अत्यंत अवश्य म्हणून वर सांगितलेली भावना सर्वांना सारखी संधी या तत्त्वामुळे निर्माण होणे बरेचसे शक्य होते. कारण मत्सराचे मूळच या व्यवस्थेने खणून निघाल्यासारखे होते.
 सर्वांना सारखी संधी या तत्त्वावर आक्षेप घेऊन एक समाजशास्त्रज्ञ