पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१२२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(११६)

म्हणतात की आज वेद वाचण्यास सर्वांना मोकळीक आहे तरी किती अस्पृश्यांनी मॅक्समुल्लरची वेदाची प्रत वाचली आहे ? वेदज्ञान सर्वांना मोकळे ठेवण्यात काही अर्थ नाही असे यावरून त्यास सुचवावयाचे आहे. पण त्यांना उलट असे विचारता येईल की ही वेदाची प्रत किती ब्राह्मणांनी वाचली आहे ? ज्यांना द्रव्यार्जन म्हणूनच वेद उच्चारावे लागतात ते सोडले, तर शास्त्री म्हणविणाऱ्यातसुद्धा ऋग्वेद सबंध ज्यांनी वाचला आहे असे किती निघतील ? आणि असे जर निघणार नसले तर ब्राह्मणांना तरी वेदाध्ययनाचा अधिकार ठेवण्यात तात्पर्य काय ? तेव्हा अशा प्रश्नात काही अर्थ नाही. पूर्वपरंपरा किंवा पूर्वीचे सदाचार प्रत्येकजण अनुसरेलच असे नाही. ते अनुसरण्यास सर्वांना मोकळीक असणे याला महत्त्व आहे. अशी व्यवस्था असली म्हणजे मागून जी विषमता शिल्लक राहते, ती विषारी असू शकत नाही. इंग्लंडांदि देशात जी विषमता आहे ती या तऱ्हेची आहे. तेथेही पैसेवाल्यांचा गट वंशपरंपरेने निराळा पडतो असे दिसू लागताच भेदाचे वारे वाहू लागतात व भांडवलवाले व मजूर असे शत्रुपक्ष निर्माण होतात. या सर्वाचा अर्थच हा की ज्यांची सुख:दुखे वंशपरंपरेने भिन्न राहाणार ते गट कधीच एकजीव होऊ शकत नाहीत. कारण ज्या परिस्थितीला आपण मुळीच जबाबदार नाही, तिच्यामुळे, अंगात कर्तृत्व असूनही आपणास खितपत पडावे लागते ही जाणीव व्यक्तीच्या आणि त्या त्या जातीच्या मनात समाज व्यवस्थेबद्दल असंतोष निर्माण करते. भांडवलवाले व मजूर यांच्यातल्या भेदाच्या भिंती जातीतल्या भेदाच्या भिंती इतक्या लंघ्य नाहीत. पण त्यांनासुद्धा वंशपरंपरेचा वास येताच त्या राष्ट्राला जाचक होतात. मग जातिभेदाच्या शाश्वत व दुर्लंघ्यभिंती किती जाचक होतील हे सांगणेच नको. जातिभेद ठेवणेच असेल तर सर्वांना समसंधी हे तत्त्व मान्य करून मग ठेवावा. म्हणजे त्याचा विषारी दात नाहीसा होईल आणि संघटनेच्या तो फारसा आड येणार नाही.
 ज्यांची सुखदुःखे एक आहेत व उत्कर्षापकर्ष सारखे आहेत तेच लोक राष्ट्र म्हणून एकत्र येऊ शकतात असे आपण पाहिले. सर्व हिंदुस्थान इंग्रजानी जिंकला व सर्वांचेच स्वातंत्र्य गेले. या एकाच गोष्टीतल्या सारखेपणामुळे, म्हणजे सर्वांचे दुःख एक झाल्यामुळे अत्यंत भिन्न अशा अनेक गटांतले व