पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१२३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(११७)

देशांतले लोक सहकार्य करून चळवळ करू लागले व या बाह्य उपाधीमुळे आपण एक असे त्यांना वाटू लागले. मग इतरही दुःखे अशीच एक झाली, व त्याबरोबर सुखेही सारखी झाली तर एकीची भावना किती वाढेल व संघटितपण किती येईल याची कल्पना कुणालाही सहज करता येण्याजोगी आहे. आणि सुखदुःखे एक असणे संघटनेला जरूर आहे हे मान्य झाल्यानंतर ती सुखदुःखे, रक्त, धर्म, इतिहास, पूर्वपीठिका व आचारविचार यांवर अबलंबून असल्यामुळे तेही शक्य तो एकरूप असावे हेही मान्य होईल असे वाटते.
 जगावयाचे असेल तर समाज केला पाहिजे, समाज टिकवून धरावयाचा असेल तर राष्ट्रकल्पनेचा अवलंब केला पाहिजे आणि तिचा अवलंब करावयाचा तर सर्वांची सुखदुःखे शक्यतो एकरूप असली पाहिजेत अशी ही प्रणाली आहे. ती जाणून ज्यांनी राष्ट्रकल्पना पूर्णत्वाला नेली ते लोक श्रेष्ठ होत व त्यांचीच प्रगती झाली आहे, हे म्हणणे अमान्य करता येणार नाही.
 राष्ट्रकल्पनेचा विचार केल्यावर त्याबरोबरच तितक्याच महत्त्वाच्या दुसऱ्या एका प्रश्नाचा विचार करणे क्रमप्राप्त होते. व्यक्ती व राष्ट्र यांचे परस्परसंबंध काय असावे हा तो प्रश्न होय.
 समाज हा व्यक्तीच्या सुखासाठी अस्तित्वात आलेला आहे तेव्हा त्यांतील प्रत्येक संस्था-धर्मसंस्था, शासनसंस्था, विवाहसंस्था- जास्तीतजास्त सुख कसे मिळेल इकडे लक्ष ठेवूनच उभारली पाहिजे या तत्त्वाकडे पुष्कळ लोक दुर्लक्ष करतात आणि मग व्यक्ती ही समाजासाठी का समाज व्यक्तीसाठी असले प्रश्न निर्माण होतात. समाजासाठी व्यक्ती या म्हणण्याला काडीचाही अर्थ नाही. समाजासाठी म्हणजे सर्व लोकांच्या सुखासाठी असा जरी अर्थ केला. (हा अर्थ त्या लोकांच्या मनात असतो असे दिसत नाही. समाज म्हणजे व्यक्तिसुखनिरपेक्ष अशी काही संस्था आहे असा त्यांच्या विचाराचा कल असतो) तरी त्या सुखासाठी व्यक्ती आहे असेही म्हणता येणार नाही. दुसऱ्यासाठी आपले सर्वस्व होमून टाकणारे महात्मे समाजात असतात व समाज त्यांना मान देतो हे खरे; पण त्या व्यक्तींना त्यांत अलौकिक समाधान वाटत असते हे एक व समाज त्याबद्दल त्यांना मोबदला देत असतो हे दुसरेही ध्यानात ठेवले पाहिजे. समाजात एकाच्या सुखासाठी दुसऱ्याने झटावे हा जो सामान्य नियम त्याच्या बुडाशी असे केल्याने प्रत्ये-