पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१२४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(११८)

काला सुख मिळेल हे तत्त्व असते आणि याचा अर्थ असा की समाज एकत्र मिळून जी सुखे निर्माण करील त्याचा वाटा सर्वांना मिळालाच पाहिजे. त्याचे प्रमाण ज्याच्या त्याच्या गुणांवर अवलंबून राहील हे खरे; पण हा जर वाटा मिळणार नसेल किंवा मिळावयाचाच नाही असे ठरले तर ती व्यक्ती किंवा तो समूह त्या समाजाचे काही एक लागत नाही. आपल्या समाजांतील अस्पृश्य समाजाचे उदाहरण असे आहे. ते लोक हिंदू समाजाचे कांही ऋण लागतात असे मला वाटत नाही उच्च प्रकारची सुखे जी समाजात निर्माण होतात ती त्यांना नाहीच मिळावयाची असे ठरले आहे. त्यांची योग्यता नाही या म्हणण्यात काडीचाही अर्थ नाही कारण योग्यता दाखविण्यास त्यांना संधीच मिळालेली नाही आणि ही संधीही नसेल तर त्या व्यक्ती समाजासाठी आहेत हे जबरदस्तीने पाहिजे तर म्हणावे. समाजरचनेच्या कोणत्याही तत्त्वा-अन्वये हे म्हणता येणार नाही.
 यापुढचा प्रश्न याहीपेक्षा महत्त्वाचा आहे. खाणे पिणे, वाचणे या सुखापेक्षाही व्यक्तीला आणखी एका प्रकारच्या सुखाची तीव्र इच्छा असते. मी जगावे, मला खावयास मिळावे ही जशी व्यक्तीच्या ठायी इच्छा असते त्याचप्रमाणे प्रत्येक बाबतीत मला काहीतरी मत असावे, माझे म्हणणे लोकांनी ऐकावे, निदान ऐकून तरी घ्यावे ही व्यक्तीला जबर आकांक्षा असते. माणसाच्या ऐपतीप्रमाणे घर, वर्ग, राष्ट्र, जग या पायऱ्या तो चढतो व त्या त्या क्षेत्रात आपले म्हणणे लोकांनी ऐकावे असा अहंकार त्याला निर्माण होतो. यालाच अलीकडच्या भाषेत व्यक्तित्व असे म्हणतात आणि माणसाच्या या व्यक्तित्वाची योग्य जोपासना करून फिरून जास्तीत जास्त व्यक्तींच्या व्यक्तित्वाचा समन्वय घडवून आणणे हे समाजातील अत्यंत दुर्घट काम आहे. शब्दप्रामाण्य हे व्यक्तित्वाच्या आड येणारे तत्त्व आहे. बुद्धिप्रामाण्य हे त्याला पोषक आहे. व्यक्तित्वाची जोपासना झालीच पाहिजे असे पश्चिमेकडील अर्वाचीन संस्कृतीचे प्राणतत्त्व आहे. आपल्याकडे गेल्या एक दोन हजार वर्षांत ते नव्हते. आता येऊ पहात आहे, पण त्याला पुष्कळांचा विरोध आहे. समाज नीट चालावयाचा असेल तर हे असेच का व ते तसेच का असे बोलावयाचा कोणासही अधिकार असता कामा नये, असे हे लोक म्हणतात. पण व्यक्तीचे व्यक्तित्व दडपून रचना केली तर तो दगडांचा