पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१२५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(११९)

किंवा फार तर पशूंचा समाज होईल. माणसाच्या व्यक्तित्वाला अवसर दिला तर समाजरचना अत्यंत अवघड होऊन बसते हे खरे. पण ते दडपणे म्हणजे मानवताच नष्ट करण्यासारखे आहे. अहंकार, व्यक्तित्व हेच मानवतेचे मुख्य लक्षण आहे. दोन दगड एकत्र ठेवले तर भांडत नाहीत हे खरे; पण त्यांच्यात प्रेम निर्माण होऊ शकत नाही, हेही तितकेच खरे आहे. माणसांच्या बाबतीत ही दोन्ही शक्य आहेत. तेव्हा दगडत्व टाकून द्यावयाचे असेल तर ही दोन्ही पत्करली पाहिजेत व त्यांतील पहिले नाहीसे करून दुसऱ्याची वाढ होईल अशी व्यवस्था समाजरचनेत केली पाहिजे. व्यक्तीच्या देहाचा नाश होऊ न देणे हे जितके महत्वाचे आहे तितकेच त्यांच्या मनाचा नाश न होऊ देणे हेही महत्त्वाचे आहे. ते जर होत नसेल तर ती समाजरचना सदोष आहे. व्यक्तित्व दडपून समाजरचना उत्तम करणे हे दगडांना एकत्र रचणे किंवा पशूंची दावण बांधणे इतक्याच कौशल्याचे आहे. अहंकाराला अवसर देऊन अनेकांच्या अहंकारांचा समन्वय करणे हेच तर बिकट कर्म कवी, तत्त्ववेत्ते, मुत्सद्दी यांना करावयाचे असते. त्यांतच त्यांची थोरवी आहे. पशूंची दावण बांधणे असे वर म्हटले आहे. पण तेही तितकेसे खरे नाही. कारण पशूंनाही व्यक्तित्व असते. त्यात जो आपले व्यक्तित्व ठासून सांगतो, बंधने अप्रिय मानतो, तो वनराज सिंह आपल्याला आवडतो. व्यक्तित्वाचा नाश सहन करणाऱ्या गाढवाचा आपण तिरस्कार करतो. गाढवापेक्षा सिंह श्रेष्ठ का याचे उत्तर आपणास हवे होते. ते उत्तर हे आहे. ओझे वाहणे ही उपयुक्तता खरी, पण आपला अहंकार प्रगट करणे हे जे सर्वात श्रेष्ठ सुख त्याचा धडाच सिंह घालून देतो. म्हणून उपयुक्ततेच्या दृष्टीनेही सिंहच श्रेष्ठ वाटतो. हे जसे पशूंमध्य तसेच माणसामध्ये आहे. व्यक्तित्व नाहीसे करून समाजरचना करणे हे सोपे आहे. मुद्रण स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य हे नाहीसे करून झार किंवा सुलतान यांचा अंमल निर्बंध चालेल हे खरे. आणि मुसोलिनी किंवा हिटलर यांनी स्वीकारलेले धोरण बिकट प्रसंगी अनुसरावे यालाही कोणी हरकत करणार नाही. मनुष्य आजारी असताना आपण तेच करीत असतो. पण बिकट प्रसगी व्यक्तित्व दडपणे निराळे व नेहमीच ती व्यवस्था असणे निराळे. व्यक्तित्व संभाळावयास लोक नालायक असले तर तेथे हुकमत असू नये, असाही आग्रह नाही. पण लोकांना ते संभाळावयास लायक