पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१२६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१२०)

करणे हेच त्या हुकमतीचे धोरण असले पाहिजे. हुकमत चालविता यावी म्हणून व्यक्तित्व दडपणे हे हीनतेचे,- पशुतेचे- दगडपणाचे लक्षण आहे. व्यक्तित्वाला अवसर दिला तर समाजरचना अवघड होऊन आणखी निराळीच दुःखे उद्भवतात हेही मान्य आहे. पण हा पेचच असा आहे. सृष्टिरचनतेला कधीही नाहीसा न होणारा हा दोष आहे. इन्सेन म्हटलेच आहे Suppress individuality and you have no life, assert it and you have war and chaos. व्यक्तित्व नष्ट करावे तर मनुष्यत्वच नष्ट होते. त्याला अवसर द्यावा तर कलह माजतो. सर्वत्र हेच दुःखद दृश्य आपणांस दिसते. स्त्रीला स्वातंत्र्य द्यावे तर पतिपत्नीचे पटत नाही. न द्यावे तर स्त्री ही माणुसकीतून खाली उतरते ! राजकारणातही तेच ! लोकशाही निर्मून प्रत्येक व्यक्तीच्या मताला अवसर देणे ही एक उत्तम व्यवस्था आहे असे आरंभी वाटत होते. पण त्यातले अनंत दोष व भयंकर वर्गकलह प्रत्ययास येऊ लागल्यामुळे पुन्हा हुकूमशाही सुरू करावी की काय असे पुष्कळांना वाटू लागले आहे. पण काही असले तरी ज्या कुटुबात किंवा राष्ट्रात जास्तीत जास्त लोकांच्या व्यक्तित्वाला अवसर आहे, तेच राष्ट्र पशुकोटीतून वर निघालेले व जास्त सुखी होय असे म्हटले पाहिजे. ज्ञान हे दुःखप्रद आहे हे तत्त्व सनातन आहे. तरी पण ज्ञानाचा मोह अनिवार आहे. कारण त्यात वरच्या दर्जाचे सुख मिळते. तेच व्यक्तित्वाचे आहे. आणि असे आहे म्हणून अनेक व्यक्तींच्या अहंकाराचा समन्वय कसा करावा हे सांगणारा तत्ववेत्ता अन्न निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यापेक्षा श्रेष्ठ ठरतो.
 ज्या समाजात राष्ट्रीय भावना वाढीस लागल्या आहेत, म्हणजे आपल्या सुखापेक्षा राष्ट्राचे सुख अधिक महत्वाचे असे जेथील व्यक्तींना वाटत आहे, व शिवाय जो समाज व्यक्तीचे व्यक्तित्व जास्तीत जास्त टिकवून धरण्याचा प्रयत्न करावयाचा या तत्त्वाने चालत आहे, तो समाज जास्त सुखी होय, असे आपण पाहिले. आणि त्यामुळे श्रेष्ठ-कनिष्ठत्वाची आणखी एक कसोटी आपल्या हाती आली. आता सुखदुःखाच्या मापनासंबंधी रा. गो. म. जोशी यांनी उपस्थित केलेल्या एकदोन मुद्यांचा विचार करून मग संस्कृतीसंबंधीच्या इतर प्रश्नांची चर्चा करू.
 रा. जोशी यांनी श्रेष्ठकनिष्ठतेचा विचार फारसा कोठे केला नाही;